आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई क्रिकेट संघटनेच्‍या अध्यक्षपदासाठी शरद पवार इच्‍छुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत 15 जुलै रोजी संपली असून शेट्टी यांच्या अर्जावर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच निवडणुकीची तारीख निश्चित करण्याचे कार्यकारिणीने ठरवले आहे. या वेळी आयसीसी, बीसीसीआय आणि एमसीएचे माजी अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याला रस असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या वास्तव्याचा पत्ता बारामतीहून पुन्हा मुंबईला हलवला आहे.


‘क्रिकेटवर पोट’ भरणार्‍यांना यापुढे एसीएची दारे बंद!

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारात तत्सम दर्जाच्या क्रिकेट सेवा करताना दुर्लक्ष होऊ नये, यासाठी गेले कित्येक दिवस चर्चेत असलेल्या निर्णयाला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीने अखेर सोमवारी मंजुरी दिली. या निर्णयानुसार यापुढे बीसीसीआय, आयपीएल फ्रॅन्चायझी, गरवारे क्लब हाऊस किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये लाभाचे पद भूषवणार्‍या अथवा आर्थिक मोबदल्यात काम करणार्‍या व्यक्तीला एसीएच्या कोणत्याही क्लबचे प्रतिनिधित्व करता येणार नाही, तसेच मतदानही करता येणार नाही.
गेली कित्येक वर्षे असोसिएशनमध्ये सन्माननीय सदस्यत्व किंवा पद भूषवणार्‍या व्यक्तींनी क्रिकेटविषयक सेवा तत्सम क्रिकेट बोर्ड, संघटना किंवा असोसिएशन यांना दिल्यानंतर वाद निर्माण झाले होते. पॉली उम्रीगर यांनी मात्र बीसीसीआयचे कार्यकारी सचिवपद स्वीकारल्यानंतर स्वत:हून एमसीएच्या कार्यकारिणीपासून स्वत:ला दूर ठेवले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट अकॅडमीचे संचालक आणि क्रिकेट विकास समितीचे अध्यक्षपद भूषवणार्‍या चंद्रकांत पंडित यांनाही आपले पद सोडावे लागले होते. त्या वेळी चंद्रकांत पंडित यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडे क्रिकेट अकॅडमीचे संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्या वेळी कार्यकारिणीने पंडित यांना राजस्थान किंवा एमसीएच्या क्रिकेट समितीचे अध्यक्षपद यापैकी एकाची निवड करण्याचे सुचवले होते. पंडित यांनी त्या वेळी एमसीएचे पद सोडण्याचा निर्णय घेतला होती.
सार्वजनिक विश्वस्त संस्था कायद्यानुसार नोंदणी असलेल्या संस्थांना आर्थिक लाभापासून दूर ठेवण्याचा नियम पाळावा लागतो. त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर नियुक्त होणारा प्रत्येक सदस्य हा विनामूल्य सेवा करणारा सदस्य त्या संस्थेचा विश्वस्त असतो. त्यामुळे कोणत्याही सदस्याला अशाच प्रकारचे लाभाचे पद स्वीकारता येत नाही, असे एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. एमसीएच्या निर्णयामुळे अकादमी, आयपीएल संघांवर प्रशिक्षक किंवा अन्य भूमिकेत काम करणारे क्रिकेटपटूही अडचणीत येणार आहेत. या निर्णयामुळे ज्यांचे क्रिकेटवरच पोट आहे, त्यांना असोसिएशनचे काम करता येणार नाही. याचा फटका आमच्यासारख्या क्रिकेट प्रशासन व्यवस्थेत काम करणार्‍या क्रिकेटपटूंनाच अधिक बसणार आहे,असे रत्नाकर शेट्टी म्हणाले.