बीजिंग - फ्रेंच ओपन चॅम्पियन
मारिया शारापोवा आणि जगातील नंबर वन नोवाक योकोविक रविवारी चीन ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरले. रशियाच्या शारापोवाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्वितोवाला पराभूत केले. रशियाच्या खेळाडूने ६-४, २-६, ६-३ ने विजय मिळवला. यासह तिने जेतेपद
आपल्या नावे केले. यासाठी शारापोवाला तब्बल दोन तास २८ मिनिटे झुंज द्यावी लागली. पराभवामुळे पेत्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
रशियाच्या शारापोवाने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारून आघाडी मिळवली. मात्र, तिला ही लय दुस-या सेटमध्ये कायम ठेवता आली नाही. चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोवाने दमदार पुनरागमनासह दुसरा सेट ६-२ ने जिंकला. याशिवाय तिने लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर तिस-या निर्णायक सेटमध्ये दोन्ही तुल्यबळ टेनिसपटूंमध्ये झुंज रंगली. शारापोवाने आक्रमक सर्व्हिस करून निर्णायक सेटमध्ये बाजी मारली. यासह तिने विजय संपादन केला.
मेहनतीचे फळ मिळाले
महिला एकेरीच्या किताबासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. जेतेपदाच्या रूपाने मला याच कष्टाचे फळ मिळाले आहे. पेत्रानेही या वेळी विजयासाठी चोख प्रत्युत्तराचा प्रयत्न केला.
मारिया शारापोवा, रशिया
योकोविककडून बर्डिचचा पराभव
जगातील नंबर वन नोवाक योकोविकने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक गणराज्यच्या टॉमस बर्डिचचा पराभव केला. त्याने आक्रमक सर्व्हिस करताना सरळ दोन सेटमध्ये अंतिम सामना जिंकला. सर्बियाच्या खेळाडूने ६-०, ६-२ अशा फरकाने शानदार विजय मिळवला.
केई निशिकोरीचा किताबाचा चौकार
टोकियो । अमेरिकन ओपनच्या उपविजेत्या केई निशिकोरीने करिअरमध्ये एटीपीच्या किताबाचा चौकार मारला. त्याने रविवारी जपान ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. त्याने स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या निशिकोरीने अंतिम सामन्यात मिलोस राओनिकचा पराभव केला. त्याने ७-६, ४-६, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला.