आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी चषक : शेष भारताची मुंबईवर मात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तब्बल 40 वेळा रणजी चॅम्पियन असलेल्या मुंबईविरुद्ध दमदार कामगिरी करून शेष भारत संघाने इराणी ट्रॉफी जिंकली. ड्रॉ झालेल्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर शेष भारताने 26 व्या वेळा इराणी ट्रॉफीवर नाव कोरले. सामन्याच्या अखेरच्या आणि पाचव्या दिवशी मुंबईकडून सलामीवीर वसीम जाफरने नाबाद शतक ठोकले.

शेष भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 526 धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईला पहिल्या डावात 409 धावाच काढता आल्या. शेष भारताने निर्णायक 117 धावांची आघाडी घेतली. दुस-या डावात शेष भारताने 5 बाद 389 धावा काढून मुंबईसमोर विजयासाठी 507 धावांचे लक्ष्य ठेवले. दिवसअखेर मुंबईने दुस-या डावात 4 बाद 160 धावा काढून सामना ड्रॉ केला. मुंबईकडून वसीम जाफरने पहिल्या डावाप्रमाणे या वेळीही दमदार फलंदाजी करताना नाबाद 101 धावा काढल्या. जाफरने 141 चेंडूंचा सामना करताना 10 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली.दुसरा सलामीवीर आदित्य तारे 11 धावा काढून बाद झाला. हरभजनने त्याला धवनकरवी झेलबाद केले. तिस-या क्रमांकावर आलेल्या अजिंक्य रहाणेने 25 धावा काढल्या. त्याने 47 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने या धावा जमवल्या. रोहित शर्मा पहिल्या डावाप्रमाणे या वेळीही फ्लॉप ठरला. अवघ्या एका धावेवर त्याला ओझाने बाद केले. अभिषेक नायर 2 धावा काढून बाद झाला. शेष भारताकडून हरभजनसिंगने 38 धावांत 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी, कालच्या 4 बाद 296 धावांवरून पुढे खेळताना शेष भारताने आज रैनाच्या रूपाने एक विकेट गमावली. रैना 71 धावा काढून दाभोळकरचा बळी ठरला. शनिवारचा नाबाद फलंदाज अंबाती रायडूने नाबाद 156 धावा ठोकल्या. रायडूने 289 चेंडूंत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने या धावा काढल्या. शेष भारताच्या 389 धावा झाल्यानंतर दुसरा डाव घोषित करण्यात आला.

जाफरचा आणखी एक विक्रम :
वसीम जाफरने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील 48 वे शतक ठोकले. 200 मिनिटे फलंदाजी करताना 141 चेंडूंत नाबाद शतक ठोकून त्याने इराणी ट्रॉफीत सर्वाधिक 1000 धावा काढण्याचा पराक्रम केला. सामना ड्रॉ झाला त्या वेळी तो नाबाद होता.

संक्षिप्त धावफलक :
शेष भारत 526. मुंबई 409. शेष भारत 5 बाद 389 (अंबाती रायडू नाबाद 156, सुरेश रैना 71), मुंबई दुसरा डाव 4 बाद 160. (वसीम जाफर नाबाद 101, 2/38 हरभजन).