आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Chhatrapati Award Declared, 11 Involved From Marathwada

शिवछत्रपती पुरस्कार जाहीर, मराठवाड्यातील 11 जण पुरस्काराने सन्मानित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तम इंगळे - Divya Marathi
उत्तम इंगळे
मुंबई - अलीकडच्या काळात निकाल निश्चितीपासून वादग्रस्त ठरलेल्या व सरकारी मार्गदर्शक तत्त्वे न मानणा-या क्रिकेट या खेळाला वगळून सोमवारी महाराष्ट्र शासनाने 2009-10, 2010-11 आणि 2011-12 अशा 3 वर्षांसाठीचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केले. मराठवाड्यातील स्नेहा ढेपे (तलवारबाजी), तेजस्विनी मुळे (नेमबाजी), सिद्धार्थ कदम (जिम्नॅस्टिक), आनंद थोरात (जिम्नॅस्टिक), कार्तिकी शिरोडकर (जिम्नॅस्टिक, सर्व औरंगाबाद) , रोहिणी आवारे व सुजता शानमे (खो-खो, उस्मानाबाद) यांना खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तर उत्तम दगडूजी इंगळे, मंगल सखाराम पांडे (दोघे परभणी), अशोक मगर (उस्मानाबाद), चंद्रजित जाधव (उस्मानाबाद) यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक/मार्गदर्शकांचा राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्यांमध्ये शूटिंग या खेळासाठी प्रचंड योगदान देणारे भीष्मराज बाम, कुस्तीसाठी आयुष्य वेचलेले बाळासाहेब लांडगे आणि नागपूरच्या अटल बहादूर सिंग यांचा समावेश आहे. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या सोयीच्या तारखा घेऊन पुण्याच्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती क्रीडा राज्यमंत्री पद्माकर वळवी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
यंदा पुरस्कार रकमेत वाढ
यंदापासून पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या रोख पुरस्काराच्या रकमेतही घसघशीत वाढ करण्यात आली आहे. जीवनगौरव पुरस्कारार्थींना प्रत्येकी 3-3 लाख, तर खेळाडू मार्गदर्शक, क्रीडा संघटक, अपंग व महिला खेळाडू यांना प्रत्येकी 1-1 लाखाचा रोख पुरस्कार मिळेल, असे वळवी यांनी म्हटले. क्रिकेट या खेळाला तिन्ही वर्षांच्या पुरस्कारार्थींच्या यादीतून वगळण्यात आल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही शासनाच्या यादीत समाविष्ट असणा-या खेळांना, व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी हा पुरस्कार देतो. क्रिकेट हा खेळ स्वयंपूर्ण आहे, असे वळवी यांनी म्हटले.
राज्य शासनाच्या क्रीडा पुरस्काराचे मानकरी
बाळासाहेब लांडगे
भीष्मराज बाम
अटलबहादूर सिंग
मंगल पांडे
उत्तम इंगळे
03 लाख रुपये जीवनगौरवसाठी
01 लाख रुपये खेळाडू, संघटकांना मिळणार
अकादमीची स्थापना : तेजस्विनी मुळे
मराठवाड्यातील नेमबाजी क्रीडा प्रकारात पहिलाच राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंदी आहे. मात्र, शासनाने थोडा उशीर केला. त्यांनी सातत्य ठेवायला हवे. आई-वडिलांनी माझ्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले आहे. क्रीडा प्रबोधिनी, व्हेरॉक ग्रुपचे आभार मानते. त्यांच्यामुळे हे यश मिळाले. सध्या माझे लक्ष्य केवळ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे आहे. जेव्हा खेळातून बाहेर पडेल तेव्हा मराठवाड्यातील खेळाडूंसाठी खास क्रीडा अकादमी स्थापन करण्याचा मानस असल्याचे तेजस्विनी मुळे म्हणाली.
महिला खेळाडू घडवणार : स्नेहा ढेपे
मला तलवारबाजीने खूप दिले आहे. आता राज्यातील मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याने क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मला तलवारबाजी खेळाने मान-सन्मान मिळवून दिल्याने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मी इतर मुली-महिला खेळाडूंना हा सन्मान मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुली व महिला खेळाडूंच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य असेल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारीपदावर जाऊन समाजासाठी विशेष कार्य करण्याची इच्छा आहे, असे स्नेहाने म्हटले.
100 टक्के योगदान द्या, यश मिळते :आनंद थोरात
आपण कोणतेही काम करतो त्यामध्ये 100 टक्के योगदान दिल्यास यश नक्की मिळते. मी पुरस्काराचा कधीही विचार केला नव्हता. केवळ खेळण्यावर आणि मेहनतीवर भर दिला. त्याचे फळ आज मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या रूपाने आपोआप मिळाले आहे. मी भविष्यात क्रीडा क्षेत्रात राहीलच असे नाही, एमपीएसीचाही अभ्यास करत आहे. नवीन प्रकार अ‍ॅरोबिक्स डान्स शिकत आहे, असे आनंदने सांगितले.
इच्छाशक्तीच्या जोरावर जग जिंकता येते : कार्तिकी
आपल्यात इच्छाशक्ती असेल तर कोणतेही अशक्यकाम शक्य होते. ध्येय समोर ठेवून ते मिळवण्यासाठी मेहनत करत राहा, आपल्याला यश नक्की मिळते, असे मत आंतरराष्‍ट्रीय जिम्नॅस्टिकपटू कार्तिकी शिरोडकरने व्यक्त केले. क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत असताना घेतला नाही. मी नेहमी स्पर्धेला आणि खेळाला प्राधान्य दिले, असे तिने नमूद केले.
आई-वडील, प्रशिक्षकांना पुरस्कार अर्पण: सिद्धार्थ
हा पुरस्कार मी आई-वडील आणि माझ्या प्रशिक्षकांना अर्पण करतो. त्यांच्यामुळे आज हे शक्य झाले. प्रशिक्षकांनी मला 2005 मध्ये अ‍ॅरोबिक्स जिम्नॅस्टिक खेळण्याचा सल्ला दिला, त्याचा मला आयुष्यात खूप फायदा झाला. देशाचा झेंडा सर्वात उंच आपल्यामुळे जात असताना पाहणे ही अभिमानाची गोष्ट आहे. सध्या युवा खेळाडूंना घडवण्यासाठी प्रशिक्षण देत असल्याचे सिद्धार्थने म्हटले.