आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरामकृष्णन यांची निवड म्हणजे भारताची ‘दादागिरी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय क्रिकेट बोर्डाच्या पदाधिका-यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबावतंत्र वाढले असून अलीकडेच आयसीसीच्या क्रिकेट समितीवरील एल. शिवरामकृष्णन यांच्या निवडीची चौकशी करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स असोसिएशनने केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये महासत्ता बनलेल्या भारताच्या दबावाखाली पाच देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आपापल्या क्रिकेट संघांच्या कप्तानांना शिवरामकृष्णन यांना मत देण्याचे आदेश दिले होते, असा आरोप खेळाडू संघटनेने केला आहे.


क्रिकेट खेळाडू संघटनेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी व माजी कसोटीपटू टीम मे यांना भारतीय क्रिकेट बोर्डाच्या हस्तक्षेपाआधी 10 देशांचा पाठिंबा होता. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे नाव न घेता त्यांनीच दडपण आणल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे. श्रीनिवासन यांनी टीम मे यांच्या बाजूची मते शिवरामकृष्णन यांच्या बाजूने फिरवल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या हितासाठी खेळाडू संघटनेच्या माध्यमातून टीम मे गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पॉल मार्श यांनी टीम मे यांचा पद्धतशीर व दबावतंत्र वापरून केलेला पराभव म्हणजे क्रिकेटमधील सर्वात दु:खद घटना असल्याचे म्हटले आहे. आयसीसी यावर कोणती कृती करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, असेही मार्श यांनी म्हटले आहे.