आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन आयः शूटिंगची अनेक ‘टार्गेट्स’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक ऑलिम्पिकचे जनक कुबर्तीन स्वत: एक नावाजलेले शूटर (नेमबाज) होते. त्यामुळे त्यांनी पहिल्या ऑलिम्पिकपासूनच शूटिंग या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हापासून आजतागायत शूटिंग या खेळातील विविध राष्ट्रांचा सहभाग कायम मोठ्या संख्येत राहिला आहे. 147 देशांपर्यंत सहभाग वाढला होता. लंडनला 108 देशांचे 390 नेमबाज दाखल झाले आहेत. शूटिंग या खेळात जागतिक दर्जाच्या कामगिरीची पात्रता प्राप्त केल्यानंतरच सहभाग घेता येतो. त्यामुळे जगातील सर्वोत्तम नेमबाजच या खेळात सहभागी होऊ शकतात.
या खेळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अलीकडे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा आणि अन्य पदकांचा शुभारंभ शूटिंगच करून देते. ऑलिम्पिकचे पहिले पदक शूटिंगचे असते. त्यामुळे सर्वप्रथम सहभागी होणा-या या खेळातील संभाव्य विजेत्यांकडून देशवासीयांची अपेक्षा मोठी असते. या अपेक्षांचे दडपण विश्वविजेत्या किंवा जगात पहिले रँकिंग असलेल्या खेळाडूवर येऊ शकते. बीजिंगला 10 मीटर्स एअर रायफलचे सुवर्णपदक पटकावताना टू ली हिने चीनच्या अब्जावधी पाठीराख्यांचे दडपण येऊ दिले नाही. लंडन ऑलिम्पिकच्या पदकांचे खातेही चीननेच उघडले. या वेळी पहिले सुवर्णपदक पटकावणारी महिली होती चीनची मी यिलिंग.
एकेकाळी युरोप खंडाची मक्तेदारी असलेला हा खेळ आज भारतासारख्या विकसनशील देशातही रुजला आहे. अनेक अडचणींवर मात करून या खर्चिक खेळातही भारताचे अनेक स्पर्धक आज जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. शूटिंग आणि टार्गेट शूटिंग या खेळाची पाळेमुळे मध्य युरोपात सापडतात. जिनिव्हात 14व्या शतकात या खेळाला प्रथम आश्रय लाभला. स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये या खेळासाठी लागणा-या आयुधांची क्रांतिकारी प्रगती झाली. या दोन देशांमध्ये लांब पल्ल्याच्या लक्ष्याचा वेध घेणा-या बंदुका तयार व्हायला लागल्या. आल्प्स पर्वतांमध्ये टार्गेट शूटिंग विकसित होत होते. त्याच वेळी इटली आणि फ्रान्समध्ये धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने शूटिंग स्पर्धा व्हायच्या.
19 व्या शतकात स्कँडिनेव्हियन देश, जर्मनी, फ्रान्स आणि सर्बिया या देशांमध्ये जिम्नॅस्टिक या खेळाच्या प्रेमाला भरते आले; परंतु शूटिंग हा खेळ न राहता देशाच्या मिलिटरीसाठी प्रशिक्षणाचे प्रमुख स्रोत बनला. स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग हा खेळ सक्तीचा करण्यात आला. 16 ते 19 वर्षे वयाच्या गटातील शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा झालाच; परंतु त्यानंतर देशाच्या लष्करात जेव्हा गरज भासेल तेव्हा सेवेसाठी रुजू होण्याचे वचनही युवकांना द्यावे लागले.
ब्रिटन अणि अमेरिकेने मात्र त्याऐवजी आपापल्या देशाच्या शूटिंग व रायफल असोसिएशनसारख्या संघटना बांधायला सुरुवात केली. अमेरिका आणि युरोपीय देशांनी दुहेरी हेतूने हा खेळ विकसित केला. खेळ आणि आंतरराष्ट्रीय पदकांवर त्यांचा डोळा होताच. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या देशांनी आपल्या लष्करासाठी प्राथमिक प्रशिक्षण म्हणूनही या खेळाचा वापर केला.
भारताने मात्र या खेळाकडे अद्याप खेळ म्हणून पाहिले नाही. स्पर्धकांनाच पुरेसे अ‍ॅम्युनेशन मिळत नाही. गन्स, बुलेट््स महागडी आहेत. अभिनव बिंद्रासारखा गर्भश्रीमंतच स्वत:च्या बळावर या खेळात प्रगत प्रशिक्षण घेऊ शकतो. स्वत:ची शूटिंग रेंज उभी करू शकतो. सुदैवाने दिल्ली आणि पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या साहाय्याने आधुनिक शूटिंग रेंज उभ्या राहिल्या आहेत. या खेळाचा पाया व्यापक करायचा असल्यास भारतासारख्या देशासाठी या दोन रेंज पुरेशा नाहीत.