नवी दिल्ली- भारताची युवा खेळाडू पी. सी. तुलसीने सोमवारी श्रीलंका ओपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचा किताब पटकावला. तसेच मिश्र दुहेरीत अक्षय देवालकर आणि प्रज्ञा गद्रे चॅम्पियन ठरले. यासह भारताच्या खेळाडूंनी श्रीलंकेत आयोजित स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला.
सहाव्या मानांकित तुलसीने दमदार पुनरागमन करताना अंतिम सामना आपल्या नावे केला. तिने महिला एकेरीच्या फायनलमध्ये चौथ्या मानांकित जीआयुन चेनचा पराभव केला. तिने 17-21, 21-15, 21-18 अशा फरकाने विजय मिळवला. भारताच्या खेळाडूने वेगवान खेळी करताना अवघ्या 65 मिनिटांमध्ये किताबावर नाव कोरले. अंतिम सामन्यातील पहिला गेम गमावल्यानंतर तिने शानदार कमबॅक करून चेनला पराभूत केले. यासह तिने लंकेत विजेतेपद मिळवून आपला दबदबा निर्माण केला.
आनंदला उपविजेतेपद
दुसर्या मानांकित आनंद पवारचे पुुरुष एकेरीचा किताब जिकंण्याचे स्वप्न भंगले. त्याला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात आनंद पवारला. कोरियाच्या ह्युन लीने पराभूत केले. त्याने 17-21, 21-10, 21-15 ने 55 मिनिटांत विजय मिळवला.
अक्षय-प्रज्ञाला विजेतेपद
अक्षय देवालकर आणि प्रज्ञा गद्रे या चौथ्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या जोडीने अंतिम सामन्यात मलेशियाच्या वोयुटुस इद्रा मावन आणि प्राजक्ता सावंतला सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. या जोडीने 21-16, 21-18 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला.