दुबई - पाकिस्तान क्रिकेट संघाने तिसर्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 113 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह पाकने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली.
मोहंमद हाफिज (नाबाद 140) आणि उमर गुल (3/19) यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर पाकने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पाकने पाच गड्यांच्या मोबदल्यात 326 धावा काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 44.4 षटकांत 213 धावांत गाशा गुंडाळला. धावांचा पाठलाग करणार्या श्रीलंकेकडून दिलशानने (59) केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. दरम्यान, मॅथ्यूजने 44, दिनेश चांदीमलने 36 धावांची खेळी केली. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. गोलंदाजीत पाकच्या उमर गुलने 19 धावा देताना तीन बळी घेतले. हाफिजने दोन विकेट घेतल्या.
पाककडून 136 चेंडूंत नाबाद 140 धावांची खेळी करणारा हाफिज सामनावीराचा मानकरी ठरला. त्याने करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी करताना 11 चौकार आणि तीन षटकार ठोकले. याशिवाय अहमद शहजादने सामन्यात 81 धावा काढल्या. मिसबाहने 40 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत श्रीलंकेकडून
तिसारा परेराने 58 धावा देत दोन
विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : 5 बाद 326 धावा वि. वि. श्रीलंका : सर्वबाद 213