आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrkant And Saina Nehawal Win In Malesia Open Badminton 1 Round

मलेशियन ओपन बॅडमिंटन : सायना नेहवालने इंडोनेशियाच्या मारियाला हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - इंडियन ओपनचे विजेतेपद मिळवल्यानंतर सलग दुसऱ्या किताबासाठी प्रयत्नशील असलेली जागतिक क्रमवारीची नंबर वन खेळाडू सायना नेहवाल आणि पुरुष खेळाडू किदांबी के. श्रीकांत यांनी पाच लक्ष डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी आपापले सामने जिंकत दुसरी फेरी गाठली.
तिसरी मानांकित सायनाने इंडोनेशियाच्या मारिया फेबे कुसुमासतुतीचे आव्हान अवघ्या ३७ मिनिटांत संपुष्टात आणताना २१-१३, २१-१६ ने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. आता पुढच्या फेरीत सायनाचा सामना चीनची क्वालिफायर खेळाडू याओ जुईशी सामना होईल. तिने थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुंगपन हिला २१-११, ११-२१, २१-१५ ने हरवले.

सायनाने पहिल्या गेममध्येच आपले इरादे जाहीर केले होते. तिने आक्रमक सुरुवात करताना ७-० ने आघाडी घेतली. मारियाने जोरदार संघर्ष करून एकेक गुण मिळवून अखेर १२-१२ असा स्कोअर केला. मात्र, सायनाने सलग गुणांची कमाई करीत गेम २१-१३ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये इंडोनेशियाच्या खेळाडूने पहिल्या गेमच्या तुलने अधिक संघर्ष केला. सुरुवातीला संघर्षानंतर स्कोअर १०-१० आणि नंतर १५-१५ असा होता. मात्र, सायनाने सलग चार गुण मिळवत २१-१६ ने गेम आणि सामना जिंकला.

के. श्रीकांतचा दणका

तत्पूर्वी, इंडियन ओपनचा विजेता आणि चौथा मानांकित श्रीकांतने पहिल्या फेरीत २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आणि क्रमवारीत २० वा असलेल्या इंग्लंडच्या राजीव ओसेफला ५६ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१०, १५-२१, २४-२२ ने हरवले. आता दुसऱ्या फेरीत श्रीकांतचा सामना चीनच्या तियान हुवेई याच्याशी होईल. त्याने मलेशियाच्या जुल्फादिल जुल्किफली याला २१-५, २१-७ ने नमवले.

पुरुष एकेरीत पहिल्या फेरीत श्रीकांतचे आव्हान तसे सोपे नव्हते. राजीवने दुसऱ्या गेममध्ये २१-१५ ने विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्ये श्रीकांत ३-७ ने मागे पडल्यानंतर गुणांची कमाई करीत ८-८ ने बरोबरी केली. यानंतर श्रीकांतने मागे वळून बघितले नाही आणि सामना आपल्या नावे केला.
कश्यप, प्रणयही जिंकले

भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत कोरियाच्या ली डोंग यून याला एक तास आणि ११ मिनिटे रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत २१-१५, ११-२१, २१-१४ ने पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. इतर एका लढतीत एच.एस. प्रणयनेसुद्धा विजयाचे खाते उघडले. प्रणयने आयर्लंडच्या स्कॉट इवान्सचे आव्हान ४१ मिनिटांत संपुष्टात आणले. प्रणयने ही लढत २२-२०, २१-१८ ने जिंकली. कश्यपने आपली लढत अनुभवाच्या बळावर जिंकली.