आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sindhu Increases Indian Pride, First Time Won World Championship Medal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंधूने वाढवली भारताची शान, पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले पदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वांगझू - भारतीय बॅडमिंटनमधील नवी आशा अर्थात युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अखेर कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. वर्ल्ड बॅडमिंटनच्या सेमीफायनलमध्ये तिचा पराभव झाला. जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या रत्चानोक इंतानोनने तिला सहजपणे 21-10, 21-13 ने पराभूत केले. इंतानोनने 36 मिनिटांत सामना जिंकला. सिंधूने प्रथमच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला आणि ती या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
सेमीफायनलमध्ये सिंधूकडून चमकदार कामगिरीची आशा होती. यापूर्वी तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये गतचॅम्पियन आणि दुसरी मानांकित चीनच्या यिहान वांगला आणि नंतर क्वार्टर फायनलमध्ये सातवी मानांकित चीनच्या शिजियान वांगला पराभूत करून धक्कादायक विजय मिळवला होता. मात्र, सेमीफायनलमध्ये तिला अशी तुफानी कामगिरी करता आली नाही. थायलंडच्या खेळाडूसमोर ती दबावात आली. इंतानोनने सिंधूला तिचे प्रमुख स्ट्रोक फोरहँड, क्रॉसकोर्ट स्मॅश मारण्याची संधी दिली नाही. यामुळे ती खूप दबावात आली.


प्रथमच विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळत असलेल्या हैदराबादची 18 वर्षीय सिंधू या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. 1983 मध्ये प्रकाश पदुकोन यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. यानंतर अंतिम चारमध्ये पोहोचणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्पर्धेत दोन मोठ्या खेळाडूंना सहजपणे मात देणा-या सिंधूकडून जागतिक क्रमवारीतील तिस-या क्रमांकाच्या इंतानोनविरुद्ध रंगतदार लढतीची आशा केली जात होती. मात्र, सेमीफायनलमध्ये सिंधूचा आत्मविश्वास ढासळला. दहावी मानांकित सिंधूने सात स्मॅश विनर आणि 14 नेट विनर मारले. दुसरीकडे इंतानोनने 21 स्मॅश विनर आणि 18 नेट विनर मारून सामना आपल्या नावे केला.


बॅडमिंटनमध्ये दोन वर्षांत दोन पदके
भारतीय बॅडमिंटनची समृद्धी दिवसागणिक वाढत आहे. याची प्रचिती दोन वर्षांत आली आहे. मागच्या वर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक जिंकले होते. या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूनेही कांस्यपदक मिळवले. या दोघी खेळाडू हैदराबादच्या असून या दोघींचे कोच गोपीचंद आहेत.


लीन डॅन फायनलमध्ये
चीनच्या लीन डॅनने पुरुष गटाच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. सेमीफायनलमध्ये त्याने व्हिएतनामच्या तिएन मिन्ह एनगुएनला 21-17, 21-15 ने मात दिली.


दुस-यांदा केला सिंधूचा पराभव
सिंधू आणि इंतानोन यांच्यात आतापर्यंत कारकीर्दीत दोन वेळा लढती झाल्या आहेत. या दोन्ही लढतीत सिंधूचा पराभव झाला. यापूर्वी याच वर्षी इंडियन ओपनमध्ये इंतानोनने सिंधूला 12-21, 6-21 ने पराभूत केले होते.


इंतानोनला ली देणार आव्हान
फायनलमध्ये इंतानोनसमोर टॉप सिडेड चीनची ली जुईरईचे आव्हान असेल. ली जुईरईने सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या यिओन जू बेईला 21-5, 21-11 ने मात दिली.


पहिला गेम : पहिल्या गेममध्ये 4-2 अशी आघाडी घेतल्यानंतर इंतानोनने मागे वळून बघितले नाही. 6-4 अशा स्कोअरवर तिने सलगपणे पाच गुण मिळवले आणि 11-4 अशी आघाडी घेतली. इंतानोनने हा गेम 21-10 ने जिंकताना 1-0 अशी आघाडी घेतली.


दुसरा गेम : इंतानोनने सिंधूच्या चुकांचा फायदा उचलताना 7-0 ने आघाडी घेतली. सिंधूने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात तिला यश आले नाही. इंतानोनने सलगपणे आपली आघाडी कायम राखताना 21-13 ने दुसरा गेम जिंकत सामना आपल्या नावे केला.


पदक जिंकल्याचा आनंद
पराभवामुळे मी फार निराश झाले आहे. मात्र, मला पदक जिंकल्याचा मोठा आनंद झाला आहे. प्रथमच मी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाले. यासाठी हे पदक माझ्यासाठी फार मोलाचे आहे. कोर्टवर जाण्यापूर्वी मी चांगली कामगिरी करण्याचा केलेला निर्धार पूर्ण केला.
- पी.व्ही. सिंधू, भारत