आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sindhu's Great Success ! Macau Open Grapri Gold Competation Won

सिंधूची गगनभरारी ! मकाऊ ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धा जिंकली.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकाऊ - या वर्षी ऑगस्टमध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर मोठय़ा स्पध्रेत विजेतेपद जिंकण्याचे पी. व्ही. सिंधूचे स्वप्न पूर्ण झाले. भारताच्या या युवा बॅडमिंटनपटूने रविवारी मकाऊ ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धा जिंकली. सिंधूचे हे दुसरे गोल्ड ग्रांप्री विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी तिने मलेशियात स्पर्धा जिंकली होती.
अव्वल मानांकित सिंधूने फायनलमध्ये सातवी मानांकित कॅनडाच्या ली मिशेलला 21-15, 21-12 ने पराभूत केले. अर्जुन पुरस्कार विजेत्या सिंधूने फायनलमध्ये सुरुवातीपासून आपली पकड निर्माण केली. ही पकड तिने अखेरपर्यंत कायम ठेवली. सामन्याच्या दोन मिनिटांतच तिने 7-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर तिने मागे वळून बघितले नाही. भारताच्या 18 वर्षीय सिंधूने 16 मिनिटांत पहिला गेम जिंकला. दुसर्‍या गेममध्ये कॅनडाच्या खेळाडूने सुरुवातीला सिंधूला संघर्ष करण्यास भाग पाडले. एक वेळ दोन्ही खेळाडू 5-5 अशा बरोबरीत होत्या. नंतर भारतीय खेळाडूने पुन्हा आपला दबदबा ठेवताना सामना 21-12 ने सहजपणे जिंकला.
जागतिक क्रमवारीत 11 व्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या सिंधूने सामन्यात पाच स्मॅश विनर्स मारले. याशिवाय तिने चार नेट विनर्सही लगावले. विश्व क्रमवारीत 30 व्या क्रमांकावर असलेल्या मिशेलने सात स्मॅश विनर्स आणि 6 नेट विनर्स मारले.
सायनाचे अपयश भरून काढले
देशाची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालसाठी 2013 हे वष्रे काही चांगले ठरले नाही. या वर्षी तिला एकही विजेतेपद जिंकता आले नाही. सायनाकडून दमदार प्रदर्शनाची आशा असताना तिने निराशा केली. अशा परिस्थितीत सिंधूच्या विजेतेपदाने भारतीय चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. सिंधूने ऑगस्टमध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकही जिंकले होते. यानंतर जपान ओपन, डेन्मार्क ओपन, फ्रेंच ओपन आणि हाँगकाँग ओपनमध्ये तिला दुसर्‍या फेरीच्या पुढे जाता आले नाही. अखेरीस मकाऊ येथे तिने बाजी मारलीच.
आम्ही खूप मेहनत घेतली
आम्ही अकादमीत खूप मेहनत घेतली. सिंधूची गती वाढवण्यासाठी आणि तिचा खेळ आक्रमक होण्यासाठी खूप प्रयत्न केले. खेळावर खास लक्ष दिले. मकाऊ ओपनमध्ये सिंधू योजनेनुसार खेळली आणि जिंकली. - पुलेला गोपीचंद, कोच.
विजयाचा विश्वास होता
मी उपांत्य सामन्यात चीनच्या खेळाडूला हरवले होते. यामुळे अंतिम सामन्यात चूक केली नाही तर सामना जिंकू शकते, असा विश्वास मला होता. जसे ठरवले तसेच मी केले आणि विजयी झाले. - पी.व्ही. सिंधू. विजेती.