आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मशाला - सलामीवीर इयान बेलच्या (113*) शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने रविवारी भारताविरुद्ध पाचव्या वनडेत विजय मिळवला. पाहुण्या इंग्लिश टीमने धर्मशाला येथील लढत 7 गड्यांनी जिंकली. आता इंग्लिश टीम विजयासह मायदेशी परतेल. या सामन्यात पराभव झाला असला तरीही भारताने पाच सामन्यांची ही मालिका 3-2 ने जिंकली.
धर्मशाला येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडने वर्चस्व राखले. सुरुवातीला त्यांनी भारतीय टीमला 226 धावांत गुंडाळले. यानंतर त्याने 48 व्या षटकात 7 गड्यांनी सामना आपल्या नावे केला. वनडे कारकीर्दीत तिसरे शतक ठोकणारा बेल नाबाद राहिला. तोच सामनावीरचा मानकरी ठरला. सुरेश रैना मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत चार अर्धशतकांसह 277 धावा ठोकल्या आणि 2 विकेटसुद्धा घेतल्या.
ब्रेसननपुढे टीम इंडिया ढेपाळली
इंग्लंडने नाणेफेक जिंकून थंड वातावरणात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅप्टन कुकची ही रणनीती यशस्वी ठरली. इंग्लिश गोलंदाजांनी टीम इंडियाच्या निम्म्या फलंदाजांना अवघ्या 79 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतवले. वेगवान गोलंदाज टीम ब्रेसननने (4/45) सुरुवातीला दोन गडी बाद केले. त्याने रोहित शर्मा (4) आणि विराट कोहली (0) यांना बाद केले. यामुळे सुरुवातीलाच टीम इंडिया बॅकफुटवर आली.
रैना-जडेजाने सांभाळले
सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. टीम इंडिया 250 धावा काढू शकेल, असे एकवेळ वाटत होते. मात्र, 156 च्या स्कोअरवर जडेजा आणि 177 च्या स्कोअरवर रैना बाद झाल्याने भारताच्या आशा मावळल्या. रैनाने वनडेत 28 वे अर्धशतक साजरे केले. यानंतर तळाचे फलंदाज अश्विन (19) आणि भुवनेश्वरकुमार (31) यांनी संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला.
दमदार बेलपुढे गोलंदाज निष्प्रभ
इंग्लंडकडून इयान बेलने सामना गाजवला. त्याने सुरुवातीला कर्णधार अॅलेस्टर कुक (22) सोबत 53 धावांची सलामी देऊन चांगली सुरुवात केली. कुक आणि केविन पीटरसन (6) एका पाठोपाठ लवकर बाद झाले. त्या वेळी इंग्लिश टीम दबावात येईल, असे वाटत होते. मात्र, बेलने भारताच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्याला मधल्या फळीत जो. रुट (31) आणि इयान मोर्गन (नाबाद 40) यांनी चांगली साथ दिली. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना बेलने नाबाद 113 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 143 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार आणि 1 षटकार ठोकला. भारताकडून शमी अहेमद, ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
113* धावा काढल्या ‘मॅन ऑफ द मॅच’ बेलने
टॉस पुन्हा बॉस
इंग्लंडने रविवारी टॉस जिंकला आणि सामनासुद्धा. याप्रमाणे धर्मशाला येथे टॉस जिंकणा -या टीमचा दबदबा कायम राहिला. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सात सामन्यांत पाच वेळ टॉस जिंकणारी टीम बॉस ठरली. येथे टॉस जिंकणा -या टीमने बहुतेक वेळा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, हे विशेष.
बेल-रैनाच्या 4000 धावा पूर्ण
सुरेश रैना आणि इयान बेल यांनी या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये आपापल्या 4 हजार धावा पूर्ण केल्या. रैनाचा हा 159 वा आणि बेलचा 124 वा सामना ठरला. दोघांनी प्रत्येकी तीन शतके ठोकली आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजानेसुद्धा 1000 धावा पूर्ण केल्या. हा त्याचा 65 वा सामना ठरला. त्याच्या नावे 70 विकेटसुद्धा आहेत.
सुरेश रैना ठरला ‘मॅन ऑ फ द सिरीज’चा मानकरी
मालिकेवर एक नजर
सामना स्थळ विजयी फरक
राजकोट इंग्लंड 9 धावांनी विजयी
कोची भारत 127 धावांनी विजयी
रांची भारत 7 विकेटने विजयी
मोहाली भारत 5 गड्यांनी विजयी
धर्मशाला इंग्लंड 7 विकेटने विजयी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.