आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा राेमांच आता मॅटवर रंगणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुरुषांबरोबरच केरळ (मंजेश्वरम) येथे २६ ते २८ डिसेंबरपर्यंत होणारी ४१वी कुमार गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मॅटवर होत आहे. मॅटवर होणारी कुमारांची ही पहिलीच स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर घेण्याचा मानही सोलापूरला मिळाला. यानिमित्ताने सोलापुरात मॅटचा श्रीगणेशा झाला.
प्रो कबड्डीमुळे प्रेक्षकांकडे आकर्षित झालेल्या कबड्डीचा पाया भक्कम करण्याचे अखिल भारतीय कबड्डी संघटनेने ठरवले. त्यामुळेच त्यांनी आता कुमार गटाकडे लक्ष दिले आहे. महाराष्ट्र कबड्डी संघटनेने महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरासाठी सोलापूर िनवडले. जिल्हा कबड्डी संघटनेच्या माध्यमातून येथील सिद्धी स्पोर्ट््स क्लबने हे सराव शिबिर येथील जिल्हा क्रीडा संकुलात घेतले आहे. कबड्डीनंतर खो-खोच्याही मॅट सोलापुरात आल्या, परंतु त्या धूळ खात पडून होत्या. सराव शिबिराच्या निमित्ताने त्या बाहेर आल्या. संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये मुला व मुलींसाठी मॅटची दोन मैदाने सिद्धी स्पोर्ट््सचे एल. के. जाधव यांनी तयार केली आहेत. संघ २३ डिसेंबरला येथून राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना होतील.
राज्य व िनमंत्रित स्पर्धा मॅटवर पाहिजे
महाराष्ट्राच्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर यश िमळण्यासाठी प्रथम जिल्हा व राज्य स्पर्धा मॅटवर होणे गरजेचे असल्याचे मत त्यांचे प्रशिक्षक संतोष शिर्के (रत्नागिरी) व सुहास जोशी (मुंबई उपनगर) यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सर्व जिल्ह्यांना राज्य शासनाकडून मॅट मिळाल्या आहेत. त्यांचा सर्वांनी स्पर्धेसाठी वापर करावा. मॅट आणि मातीमध्ये भरपूर फरक आहे. वर्षभर मातीवर सराव आणि स्पर्धेपूर्वी मॅट यामुळे मॅटवर चढाई करताना खेळाडूंना त्रास होतो, दुखापत होते. त्यामुळे त्यांची पकडही लवकर होते. सोलापुरातील सराव शिबिराचा आम्हाला निश्चित फायदा होईल.
अौरंगाबाद, बीडचे खेळाडू
संघात औरंगाबादच्या सुनील दुबिले व बीडच्या ज्ञानेश्वर नागवेचा समावेश आहे. सोलापूरचे भीम गायकवाड व सांगोला येथील प्राध्यापिका अश्विनी मिसाळ यांची संघव्यवस्थापकपदी िनयुक्ती झाली आहे. हे खेळाडू संघाकडून चमकदार कामगिरी करतील असे चित्र आहे.
मुले : मयूर शिवतकर (कर्णधार), दिनेश बापर्डेकर, आकाश गोजारे (मुंबई शहर), मिथेश पाटील, राहुल सिंग (रायगड), सुनील सिद्धगवळी (पुणे), आकाश कदम (मुंबई उपनगर), रवींद्र कुमावत (सांगली), राहुल भोईर (ठाणे), प्रसाद पवार (रत्नागिरी), सुनील दुबिले (औरंगाबाद), ज्ञानेश्वर नागवे (बीड).
मुली : सोनाली शिंगटे (कर्णधार), तेजस्विनी पोटे, पौर्णिमा जेधे (मुंबई शहर), सत्यवान हळदकेसरी, दीक्षा झोरी, काजल जाधव (पुणे), तृप्ती सोनवणे, सायली जाधव (मुंबई उपनगर), श्रद्धा पवार (रत्नागिरी), भार्गवीर माने (रायगड), स्नेहा टिळवे (सिंधुदुर्ग), देविका कदम (ठाणे).