आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमदेवसमोर असेल नोवाक योकोविकचे तगडे आव्हान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेव्हिस चषक वर्ल्ड ग्रुपच्या प्लेऑफमध्ये भारतासमोर नोवाक योकोविकच्या सर्बिया टीमचे तगडे आव्हान असेल. येत्या 12 सप्टेंबरपासून या दोन्ही संघांमध्ये प्लेऑफचा सामना रंगणार आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी भारतीय संघाने प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला. या टीमने दक्षिण कोरियाला घरच्या मैदानावर पराभूत केले.
आता 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान सर्बियाविरुद्ध सामन्यातही विजयाची लय कायम ठेवण्याचा भारतीय टेनिस संघाचा प्रयत्न असेल. सध्या भारताचा पुरुष एकेरीचा नंबर वन खेळाडू सोमदेव देववर्मन जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने पुरुष एकेरीत निर्णायक सामना जिंकून भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवून दिला. आता त्याला जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या नोवाक योकोविकच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. योकोविक पुरुष एकेरीत सर्बियाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर योकोविकला नमवण्याची मोठी संधी सोमदेवला आहे. त्यासाठी त्याला प्रचंड मेहनतही घ्यावी लागेल.
तसेच नोवाक योकोविकने केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर सर्बियाला यजमान भारताला घरच्या मैदानावर धूळ चारण्याची संधी आहे. यासाठी योकोविककडून मोठ्या खेळीची आशा आहे.
असे रंगतील प्लेऑफ सामने
भारत वि. सर्बिया
ब्राझील वि. स्पेन
कॅनडा वि. कोलंबिया
अमेरिका वि. स्लोव्हाक गणराज्य
ऑस्ट्रेलिया वि. उझबेकिस्तान
हॉलंड वि. क्रोएशिया.
ब्राझील-स्पेन समोरासमोर
डेव्हिस चषकात ब्राझील आणि स्पेन समोरासमोर असतील. तसेच कॅनडाचा सामना कोलंबियाशी होणार आहे. अमेरिका आणि स्लोव्हाक गणराज्य यांच्यातही डेव्हिस चषकाचा प्लेऑफ सामना होणार आहे.