आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Mirza And Seema Puniya Won Each Gold Medal, Divya Marathi

आशियाई स्पर्धेत सानिया मिर्झा, सीमा पुनिया ठरल्या \'गोल्डन गर्ल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - टेनिसस्टार सानिया मिर्झाने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना इंचियोन एशियाड क्रीडा स्पर्धेतील टेनिसच्या मिश्र दुहेरीत साकेत मिनेनीसोबत सुवर्णपदक जिंकून तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. दुसरीकडे सीमा पुनियाने दमदार प्रदर्शन करताना महिलांच्या थाळीफेकीत ६१.०३ मीटरचे अंतर पार करून भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. सोमवारचा दिवस गाजवणा-या सानिया आणि सीमाच "गोल्डन गर्ल' ठरल्या.

सीमाला सुवर्ण यश मिळाले. मात्र, तिच्यापेक्षा अनुभवी कृष्णा पुनिया चौथ्या स्थानी आली.सीमाने चौथ्या प्रयत्नात ६१.०३ मीटरपर्यंत थाळी फेकून सुवर्ण जिंकले. चीनच्या जियाओजिन लू हिने ५९.३५ मीटरच्या अंतरासह रौप्यपदक, तर चीनच्याच जियान तान हिने ५९.०३ मीटरच्या कामगिरीसह कांस्यपदक निश्चित केले. चौथे स्थान पटकावणा-या कृष्णा पुनियाने ५५.५७ मीटरपर्यंत थाळी फेकली.

पदकाचे रंग बदलले
सीमाने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील थाळीफेकीत रौप्यपदक जिंकले होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने रौप्यपदकाच्या जागी सुवर्ण जिंकले. सीमाने २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य आणि मेलबर्न २००६ च्या राष्ट्रकुलमध्ये रौप्य मिळवले होते. महिलांच्या लांब उडीत भारतीय खेळाडू एम. प्रजुषा व मयुखा जॉनी यांनी निराश केले.

सानिया-साकेतचे सुवर्ण यश
दुहेरीत जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक असलेल्या सानिया मिर्झाने साकेत मिनेनीसोबत भारताला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून दिले. भारताचे हे या स्पर्धेतील एकूण सहावे सुवर्णपदक ठरले. दुहेरीचा तज्ज्ञ खेळाडू साकेतने सनमसिंगसोबत पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले. सानियाचेसुद्धा हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी सानियाने प्रार्थना ठोंबरेसोबत महिला दुहेरीत कांस्य जिंकले होते.

सानिया-साकेतच्या जोडीने दुसरी मानांकित जोडी तैवानचे सिएन यिन पेंग आणि हाओ चिंग चान या जोडीला ४४ मिनिटांत ६-४, ६-३ ने पराभूत करून सुवर्णपदक भारताच्या खात्यात जमा केले. सानियाने स्पर्धेपूर्वी आशियाई स्पर्धेतून माघार घेतली होती. नंतर तिने हा निर्णय बदलताना स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले.

साकेत-सनमचे रौप्य : सनम आणि साकेत जोडीला द. कोरियाचा लिम योंगक्यू आणि चुंग हियोन यांनी एक तास आणि २९ मिनिटे चाललेल्या लढतीत ५-७, ६-७, ०-२ ने पराभूत केले. साकेत-सनमने पहिला सेट गमावल्यानंतर दुस-या सेटमध्ये चांगला खेळ केला. हा सेट टायब्रेकरमध्ये सहजपणे कोरियाच्या खेळाडूंनी जिंकत सुवर्णपदक आपल्या नावे केले

"स'ची सुवर्ण कमाल
भारताने सोमवारी दोन सुवर्णपदक जिंकले. योगायोग असा की हे पदक जिंकणा-या दोन्ही खेळाडूंच्या नावाचे पहिले अक्षर "स' आहे. थाळीफेकीत सीमा अंतिल पुनियाने सुवर्ण, तर टेनिसमध्ये सानिया आणि साकेत यांनी पदक मिळवले.

६१.०३ मीटरचे अंतर पार करून भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक सीमा पुनियाने मिळवून दिले.

जैशाला कांस्यपदक
भारताच्या ओ.पी. जैशाने महिलांच्या १५०० मी. शर्यतीत चार मिनिटे १३.४६ सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले. नवीनकुमारने पुरुषांच्या ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ८ मिनिटे ४०.३९ सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक निश्चित केले. भारताने मैदानी स्पर्धेत तीन दिवसांत एक सुवर्ण, एक रौप्य आ सहा कांस्यपदकांसह एकूण ८ पदके जिंकली. मागच्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताची कामगिरी चांगली ठरत आहे.
पुढे वाचा... ‘पंच’रंगी यशाने सानिया आनंदी