भारत आणि द. आफ्रिकेदरम्यान लवकरच क्रिकेट मालिकेला प्रारंभ होणार आहे. आफ्रिकेने गेल्या ९ वर्षांत विदेशी जमिनीवर एकही मालिका गमावलेली नाही. भारत दौर्यासाठीही त्यांनी खास डावपेच आखले आहेत. संघात तीन फिरकीपटूंना घेतले आहे. इम्रान ताहिर, डेन पीएड आणि सायमन हार्मर ही ती नावे. हे सारे गोलंदाज अनुभवी नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लेगस्पिनर इम्रान ताहिरने १६ कसोटीत ४३ बळी मिळवले आहेत. ऑफस्पिनर हार्मरने आतापर्यंत ३ तर पीएडने केवळ एक कसोटी सामना खेळला आहे.
आफ्रिकेचे गोलंदाजीचे नेतृत्व स्टेनच करत आला आहे. फिलेंडर आणि मोर्केलसारखे तुफानी गोलंदाज हीच खरी आफ्रिकेची ताकद. अशा वेळी स्टेन ब्रिगेडऐवजी फिरकीपटूंना महत्त्व देण्याचे कारण म्हणजे भारत दौर्यात केवळ वेगवान गोलंदाजांवरच भिस्त नको हे. त्यांच्याकडे ड्युमिनी नामक अवलिया आहे. तो पूर्णवेळ गोलंदाजी करू शकतो. पाहुण्यांनी वेगाशिवाय फिरकीच्या तालावर भारतीयांना नाचवण्याचा चंग बांधला आहे. २०१२-१३ च्या दौर्यात इंग्लंडच्या माँटी पानेसर आणि ग्रॅम स्वान जोडीने भारताविरुद्ध मॅचविनरची भूमिका बजावली होती, हे आफ्रिका जाणून आहे. पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताने खेळपट्टी फिरकीला जास्त अनुकूल बनवली. मात्र घडले उलटेच. इंग्लंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. त्यामुळे आपण मालिका गमावली. तेव्हा फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजांचे कच्चे दुवेही उघडे पडले. भारतीय भूमीवर यापूर्वीही अनेक विदेशी फिरकीपटूंनी यशपताका फडकावली आहे. १९६६-६७ मध्ये वेस्ट इंडीजचा लान्स गिब्ज, १९७६ मध्ये इंग्लंडचे डेरेक अंडरवूड, पॅट पोकॉक आणि १९८४-८५ मध्ये इंग्लंडच्याच फिल अॅडमंड्सने भारतीय फलंदाजांना हैराण केले होते.
घरच्या मैदानावर फिरकीचे अस्त्र वापरून भारत मालिका जिंकेल, हा शुद्ध भाबडेपणा ठरावा. तीन मालिका आठवतात. ज्यात विदेशी संघ मालिका विजयासह थाटात परतले. १९९२ मध्ये पाकिस्तान, १९९९-२००० मध्ये द.आफ्रिका आणि २००४-०५ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतात येऊन भाव खाल्ला. भारतीय संघात तेव्हा सचिन तेंडुलकर, मो.अझरुद्दीन, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविडसारखे गुणवान फलंदाज होते. विदेशी फिरकीपटूंनी या दिग्गजांनाही नाचवले. भारतीय फिरकीपटूंचा विचार केल्यास गेल्या दोन दशकांत आपल्या विजयाची टक्केवारी यांच्यामुळे वाढली आहे. कुंबळे, राजू आणि हरभजनने अनेक सामने जिंकून दिले. आता आश्विनवर सारी भिस्त आहे. पाहुण्यांचा विचार केल्यास ताहिर ब्रिगेडची क्षमता जोखणे कठीण आहे. ती मॅचविनर बनेल असे तर म्हणणार नाही, मात्र खूप काही शिकेल हे निश्चित.