लंडन - फॉर्मात असलेल्या सदरलँडने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शानदार विजयाची नोंद केली. या संघाने कॅसल पॅलेसचा ३-१ अशा फरकाने पराभव केला.स्टीव्हन फ्लेचर (३१, ९० मि.) आणि जॉर्डी गोमेझ (७९ मि.) यांच्या शानदार गोलच्या बळावर सदरलँडने सामना जिंकला. सदरलँडच्या डब्ल्यू. ब्रावोनने आत्मघातकी गोल करून कॅसल पॅलेसला बरोबरी मिळवून दिली होती. मात्र, या संघाला सामन्यात बरोबरी कायम ठेवता आली नाही. यासह प्रतिस्पर्धी संघाने लढतीत बाजी मारली.
सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला स्टीव्हन फ्लेचरने सामन्यात गोलचे खाते उघडले. यासह सदरलँडने लढतीत १-० ने आघाडी मिळवली. मध्यंतरापूर्वी लढतीत बरोबरी साधण्यासाठी पॅलेसच्या खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, या संघाला समाधानकारक यश मिळाले नाही.
दरम्यान, दुस-या हाफमध्ये ब्रावोनने आत्मघातकी गोल करून कॅसलला लढतीत १-१ ने बरोबरी मिळवून दिली. दरम्यान, ही बराेबरी फार काळ कायम राहिली नाही. सामन्याच्या ७९ व्या मिनिटाला जॉर्डीने केलेल्या गोलच्या बळावर सदरलँडला २-१ ने आघाडी घेतली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत स्टीव्हनने दुसरा गोल करून संघाचा विजय निश्चित केला.
रायो व्हॅलेकानोचा पराभव
ला लीगमध्ये रायो व्हॅलेकानोला पराभवाला सामोरे जावे लागले. एलिबार संघाने व्हॅलेकानोवर मात केली. या संघाने ३-२ ने सामना जिंकला. एम.आर्युबेमेनाने ८६ व्या मिनिटाला शानदार गोल करून एलिबारला विजय मिळवून दिला. पिओवास्सारीने (४९ मि.) संघाच्या विजयात एका गोलचे योगदान दिले. आयुर्बेमेनाने ३ एलिबारसाठी पहिला गोल केला होता. तसेच व्हलेकानोकडून एल. बातिस्वानने (६७, ६८ मि.) केलेली गोलची खेळी व्यर्थ ठरली.