लक्झेमबर्ग - स्पेन, स्लोव्हाकिया, इंग्लंड फुटबॉल संघांनी २०१६ युरो चषक पात्रता फेरीतील
आपली विजयी मोहीम अबाधित ठेवत आगेकूच केली. स्पेन संघाने पात्रता फेरीत यजमान लक्झेमबर्गविरुद्ध ४-० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. याशिवाय स्लोव्हानिया संघाने लढतीत बेलारूसचा १-० पराभव केला.
डी सिल्व्हा (२६ मि.), अल्सासेर (४२ मि.), डीएगो कोस्टा (६९ मि.) आणि बेर्नाट (८८ मि.) यांनी प्रत्येकी एका गोलच्या बळावर स्पेनला शानदार विजय मिळवून दिला. सुमार कामगिरीने यजमान संघाला घरच्या मैदानावर एकही गोल करता आला नाही. त्यामुळे या संघाला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. स्पेनला पहिल्या गोलसाठी तब्ल २६ व्या मिनिटांपर्यंत झुंज द्यावी लागली.
तसेच झेगिंन (३४ मि.) आणि डुर्माझ (४६ मि.) यांनी स्वीडनला शानदार एकतर्फी विजय मिळवून दिला. या संघाने लढतीत लिइचेटेनस्टीनचा पराभव केला. दमदार सुरुवात करून स्वीडन संघाने ३४ व्या मिनिटाला लढतीत गोलचे खाते उघडता आले. झेंगिनने स्वीडनला हे यश मिळवून दिले. त्यानंतर दुस-या हाफमध्ये डुर्माझने गोलचा धमाका उडवून संघाचा ४६ व्या मिनिटाला विजय निश्चित केला.
रुनीचा गोल; इस्टोनिया पराभूत
पात्रता फेरीत वायने रुनीने केलेल्या शानदार गोलच्या बळावर इंग्लंड संघाने रोमहर्षक विजय मिळवला. या संघाने लढतीत इस्टोनियाचा १-० अशा फरकाने पराभव केला. दोन्ही संघांतील हा रंगतदार सामना ७२ व्या मिनिटांपर्यंत शून्य गोलने बरोबरीत रंगला होता. अखेर सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला वायने रुनीने इंग्लंडसाठी विजयी गोल केला. दरम्यान, इस्टोनियाने लढतीत बरोबरी साधण्यासाठी केलेले प्रयत्न शेवटपर्यंत यशस्वी होऊ शकले नाहीत.