रिओ दि जेनेरिओ- स्पेन आणि जर्मनीचे संघ आमच्या संघापेक्षा अधिक चांगले आहेत, असे मत ब्राझीलच्या स्ट्रायकर नेमारने व्यक्त केले.
त्याने आपल्या संघातील दुबळ्या बाजू आणि सराव शैलीवरदेखील टीका केली. आम्हाला स्पेन आणि जर्मनीशी बरोबरी करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. हे दोन्ही संघ आमच्यापेक्षा अधिक मजबूत आहेत. आम्हाला ते स्वीकारावे लागेल. शैली आणि खेळातील समर्पणाबाबतीत आम्ही या युरोपियन संघापेक्षा खूप मागे आहोत, असे स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून खेळणार्या नेमारने म्हटले. युरोपात प्रत्येक सराव सत्रात गंभीरतेने लक्ष दिले जाते. तसे ब्राझीलमध्ये होत नाही असे नेमार म्हणाला.