आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी दबावात! तज्ज्ञांच्या मते, धोनीच्या खेळात आधीसारखी चमक आता नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दणादण षटकार खेचून मॅच फिनिश करणारा अशी चाहत्यांच्या मनात ओळख असलेल्या धोनीने कानपूर येथे आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत ३१ चेंडूंत केवळ एक चौकार मारला. त्याच्या या सुमार प्रदर्शनामुळे भारताच्या हातून विजय निसटला. सलग सुमार प्रदर्शन आणि भारताच्या पराभवामुळे धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

बांगलादेशातील वनडे मालिकेत पराभव, आफ्रिकेविरुद्ध दोन टी-२० सामन्यांत पराभव आणि कानपूर येथील पराभवानंतर धोनीवर दबाव वाढला आहे. धोनीच्या खेळात आता पूर्वीसारखी ‘ती’ चमक राहिलेली नाही, असे मत माजी कर्णधार मोहंमद अझरुद्दीनने व्यक्त केले.

धोनीला फलंदाजी क्रम बदलावा लागेल : अझर
धोनी आता आधीसारखा निर्भीड खेळाडू मुळीच राहिलेला नाही. त्याला पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे. त्याच्यावर निश्चितपणे दबाव आहे. त्याची कामगिरी सुमार राहिली तर निवड समितीला नाइलाजाने त्याच्याबाबत विचार करावाच लागेल. धोनीने फलंदाजी क्रमात बदल केला पाहिजे. फिनिशरबाबत मी बोलत नाही. प्रत्येक फलंदाजाकडे फिनिशिंग स्किल असली पाहिजे. विजयासाठी ५० धावांची गरज आहे आणि एखादा फलंदाज ७० धावांवर खेळत असताना तो विजयाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू शकत नाही. जोपर्यंत खेळपट्टीवर फलंदाज आहे तोपर्यंत त्याने संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या संघांचे कर्णधार कायम आहेत. कारण त्यांच्याकडे सेकंड लाइन नाही. मात्र, धोनीची जागा घेण्यासाठी कोहली तयार आहे, असे अझहरने म्हटले.

विचार करण्याची गरज : श्रीकांत
जेथे चेंडूला चांगली उसळी मिळते तेथे महेंद्रसिंग धोनी हा चांगली कामगिरी करतो. भविष्यात धोनी पूर्वीप्रमाणे आक्रमक खेळताना दिसेल असे मला वाटत नाही. त्यामुळे आता धोनीने विचार करून फलंदाजी क्रम ठरवायला हवा, असे माजी कर्णधार श्रीकांतने म्हटले.

कुंबळेचा धोनीला पाठिंबा
टीम इंडियाचा कर्णधार धोनीची भूमिका बदलली आहे असे मला मुळीच वाटत नाही. ताे अजूनही चांगला फिनिशर आहे. त्याने तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर येण्याची गरज नाही. कानपूर येथे त्याने एक मोठा फटका मारून विजय मिळवला असता तर आज चित्र वेगळे राहिले असते, असे माजी कर्णधार अनिल कुंबळेने म्हटले.
धोनी अजूनही बेस्ट फिनिशर : गावसकर
धोनीला बळीचा बकरा बनवले जात आहे. तो अजूनही टीम इंडियाचा नंबर वन फिनिशर आहे यात मला कसलीच शंका वाटत नाही. हे स्पष्ट आहे की, वाढत्या वयात शारीरिक क्षमता घटते. मात्र, हे फक्त खेळातच होते असे नाही. सर्व क्षेत्रांत असे होते. धोनी अजूनही उत्तम फिनिशर आहे. त्याला लयीत येण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले.

कोहली : १२ सामन्यांत एकही अर्धशतक नाही
धोनीवर सध्या सर्वत्र टीका होत असली तरी विराट कोहलीनेसुद्धा या वर्षी वनडेत सुमार कामगिरी केली आहे. कोहलीने २०१५ मध्ये १६ सामन्यांत २९.९२ च्या सुमार सरासरीने केवळ ३८९ धावा काढल्या. यात एक शतक ठोकले. हे शतक त्याने वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध काढले होते. गेल्या १२ सामन्यांत त्याला एकही अर्धशतक काढता आलेले नाही.

धोनीचा करिअरमधील कामगिरीचा आलेख

आधी
> २००७ मध्ये नेतृत्व सांभाळले. त्या वेळी दुसरा दावेदार नव्हता. वय २६ वर्षे होते.
> टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्डकप २०११ जिंकले.
> २०१३ मध्ये वनडेत धोनीचा स्ट्राइक रेट १५१ असा जबरदस्त होता.
> धोनी सर्वोत्तम फिनिशर होता.
> कर्णधार धोनीची रणनीती यशस्वी ठरायची. विरोधी संघ घाबरायचे.
आता
> कसोटीचे नेतृत्व सोडले आहे. वनडेत आता कोहली नेतृत्वासाठी प्रबळ दावेदार आहे. धोनीचे वयही ३४ झाले आहे.
> २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये भारत सेमीफायनलमध्ये हरला.
> आता वनडेचा स्ट्राइक रेट ११४ आहे.
> अखेरच्या ५ वनडेत १५२ धावा काढता आल्या. ४ मध्ये पराभव.
> धोनीची रणनीती फ्लॉप होत आहे.

शेवटचे ५ वनडे कामगिरी
> भारत वि. ऑस्ट्रेलिया, वर्ल्डकप सेमी. निकाल : भारताचा पराभव. धोनीचे प्रदर्शन : फलंदाजी नाही, एकही झेल, यष्टिचीत नाही.
> भारत-बांगलादेश. निकाल : भारताचा पराभव. धोनीचे प्रदर्शन : ५ धावा. झेल, यष्टिचीत नाही.
> भारत-बांगलादेश :निकाल : भारताचा पराभव. प्रदर्शन : ४७ धावा, १ झेल.
> भारत-बांगलादेश. निकाल : भारताचा पराभव. धोनीचे प्रदर्शन : ६९ धावा, एक झेल.
> भारत-द. आफ्रिका, कानपूर. निकाल : पराभव. प्रदर्शन : ३१ धावा.
बातम्या आणखी आहेत...