आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: एक देश, एक खेळ, मग भेदभाव का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला क्रिकेट संघ एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. विश्वचषक स्पर्धेत संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीआधीच संपुष्टात आले, पण क्रिकेटप्रेमी देशात चर्चा नाही. भारतीय महिला क्रिकेटपटूंकडे ना पैसा आहे, ना संघाला जाहिराती मिळतात.

खेळ एकच, स्थानदेखील एकच, पण दोन्ही संघांना मिळणारी वागणूक मात्र वेगवेगळी. एप्रिल 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक पटकावला. त्या वेळी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये चाहत्यांची गर्दी ओसंडून वाहत होती. प्रत्येक जण खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी, त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धडपड करत होता. विश्वविजेत्या संघातील खेळाडूंबरोबर असे होणे स्वाभाविक आहे. भारतासारख्या क्रिकेटवेड्या आणि खेळाडूंना देव मानणाºया देशात तर हा प्रकार म्हणजे काहीच औत्सुक्याचा विषय नव्हता. परंतु सध्या सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेनिमित्त भारतीय महिला संघ ताज हॉटेलमध्ये उतरला तर त्याची कोणाला कल्पनासुद्धा नव्हती. महिला क्रिकेटमध्ये नंबर एकचा संघ असूनही भारतीय संघाच्या वाट्याला ही अवस्था आली. भारतीय महिला क्रिकेट संघाने चार वेळा आशिया चषक जिंकला आहे. एकवेळ विश्वचषक उपविजेतेपद आणि दोन वेळा टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत जाण्याची कामगिरी या संघाने केली आहे. सध्या संघ एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. असे असताना संघातील अनेक खेळाडूंना कोणी ओळखतही नाही. भारतात महिला वर्ल्डकप सुरू असून त्याच्याविषयी ना वातावरण आहे, ना संघाला प्रोत्साहन देण्यासाठी फारसे कोणी उत्सुक होते. भारतात महिला क्रिकेटची किती उपेक्षा केली जाते याचा अंदाज या स्पर्धेवरून घेता येईल. एकाच देशात एकाच क्रीडा प्रकारात असा दुजाभाव पाहण्यास मिळत असल्याने महिला संघाला प्रसिद्धीही नाही आणि पैसाही नाही, अशी अवस्था आहे. देशातील क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या बीसीसीआयमध्येसुद्धा महिलांना फारसे स्थान मिळालेले नाही.

सामना शुल्कही मिळत नव्हते


2007 पूर्वी महिला क्रिकेटचे नियंत्रण वुमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया (डब्ल्यूसीएआय) नावाच्या संस्थेकडे होते, परंतु ही फक्त नाममात्र संघटना होती. त्यांच्या काळात महिला खेळाडूंना सामना शुल्कसुद्धा मिळत नव्हते. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांच्यानुसार विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना स्वत: पैशाची जमवाजमव करावी लागत होती. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने दिलेल्या आदेशानुसार बीसीसीआयने महिला संघाची जबाबदारी उचलली. त्यानंतर महिला क्रिकेटची परिस्थिती काही प्रमाणात सुधारली. महिला खेळाडूंना पैसे, राहण्यासाठी चांगल्या हॉटेलची सुविधा आणि सरकारी नोक-यांची संधी निर्माण झाली. एडुलजी यांच्या मते देशांतर्गत क्रिकेट खेळाडूंना आता ज्या सुविधा मिळतात, त्या पूर्वी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही मिळत नव्हत्या.