आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Guide News In Marathi, Sport And Service Directorate

राज्यातील कंत्राटी क्रीडा मार्गदर्शकांचा प्रश्न मार्गी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील सात महिन्यांपासून वार्‍यावर असलेल्या राज्यातील 72 पैकी 62 कंत्राटी क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तींचा प्रश्न अखेर मार्गी लागला. या कंत्राटी मार्गदर्शकांना तत्काळ नियुक्तीपत्र देऊन रुजू करण्याचे आदेशच शासनाने दिले. त्यामुळे आठवडाभरात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्यासंबंधीचे आदेशही जिल्हा क्रीडा कार्यालयांनाही पाठवण्यात आले.


दैनिक ‘दिव्य मराठी’ने पाच मार्च रोजी ‘सात महिन्यांपासून राज्यातील क्रीडा मार्गदर्शकांची वार्‍यावरची वरात’ वृत्त प्रकाशित केले. नियुक्तीपत्र व मानधनाअभावी कार्य करणार्‍या कंत्राटी मार्गदर्शकांच्या अडीअडचणींवर प्रकाश टाकला. या वृत्ताची दखल घेऊन राज्य शासनाने मार्गदर्शकांच्या नियुक्त्यांचे आदेश दिले. त्यामुळे या मार्गदर्शकांसोबत करार करण्यात येणार आहे.


दोन महिन्यांचे मानधन वार्‍यावर : राज्याचे क्रीडामंत्री डॉ. पद्माकर वळवी यांनी जानेवारीत क्रीडा मार्गदर्शकांच्या कंत्राटाला मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या घोषणेनंतरही तब्बल दोन महिन्यांपासून या मार्गदर्शकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली नाहीत. त्यानंतर आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यात या मार्गदर्शकांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या मार्गदर्शकांना जानेवारी आणि मार्चदरम्यानच्या दोन महिन्यांच्या मानधनांना मुकावे लागणार आहे.


करारानंतरच नियुक्ती
राज्यात 62 क्रीडा मार्गदर्शकांसोबत नव्याने कंत्राटी पद्धतीने करार करण्यात येणार आहेत. येत्या 31 मे 2014 पर्यंत हा करार करण्यात येईल. जिल्ह्यातील नियुक्त क्रीडा मार्गदशर्कांना करारबद्ध करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आली आहे. करारबद्ध झालेल्या दिवसांपासूनच क्रीडा मार्गदर्शकाची नियुक्ती ग्राह्य धरली जाणार आहे.