आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - राज्यातील 72 क्रीडा मार्गदर्शकांना गेल्या सात महिन्यांपासून ना नियुक्तिपत्र आहे, ना पगार..! .. वेतनाशिवाय हे क्रीडा मार्गदर्शक सध्या मैदानावर खेळाडू घडवण्याचे काम करीत असले, तरीही त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेही वेळ नाही.
खेळ आणि खेळाडूंची वाढती संख्या आणि क्रीडा धोरणाचा विचार करता राज्य शासनाने 2012 मध्ये राज्यात 72 क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने करण्यात आल्या. त्यांच्या कराराचा कालावधी जुलै 2013 रोजी संपला. यानंतर राज्यातील या क्रीडा मार्गदर्शकांना लगेचच पुनर्नियुक्त केले जाईल, असे आश्वासित करण्यात आले. दरम्यान, राज्याचे नवे क्रीडाधोरणही जाहीर झाले. मात्र, या क्रीडा मार्गदर्शकांच्या राज्यातील नियुक्त्या अद्याप रखडलेल्याच आहेत.
क्रीडामंत्र्यांची घोषणा
अखेर क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी 16 जानेवारी 2014 रोजी मुंबईत या 72 क्रीडा मार्गदर्शकांना लवकरच नवे नियुक्तिपत्र आणि करारात मुदतवाढ करणार असल्याचे जाहीर केले. या वेळी मंत्रिमहोदयांच्या घोषणेनंतर आतापर्यंत जवळपास दोन महिने उलटत आले आहेत. मात्र, अद्याप सर्व काही हवेतच आहे. राज्यात या 72 पैकी एकाही क्रीडा मार्गदर्शकाला अद्याप ना नियुक्तिपत्र मिळाले, ना वेतन. विशेष म्हणजे पगार, नियुक्तिपत्र नसताना हे क्रीडा मार्गदर्शक खेळाडू घडवण्याचे आपले काम अखंडितपणे करीत आहेत. मात्र, त्यांच्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आठवडाभरात नियुक्तिपत्र
क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीबाबतचा रखडलेला प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार आहे. यासाठी आठवडाभरात कंत्राटी क्रीडा मार्गदर्शकांना नियुक्तिपत्र देण्यात येतील. यासाठीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पंकज कुमार, आयुक्त, क्रीडा व युवक संचालनालय, पुणे.
15 दिवसांपूर्वीच स्वाक्षरी
राज्यात कंत्राटी पद्धतीने कार्य करणा-या क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तिपत्रांवर स्वाक्षरी केल्या आहेत. मागील 15 दिवसांपूर्वीच स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या नियुक्तिपत्रांचे वितरण लवकर करण्यात येईल.
पद्माकर वळवी, क्रीडामंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.