आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोत्साहनासाठी क्रीडा शिक्षकांना पुरस्कार, पुरस्काराचे स्वरूप असेल राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील शासनमान्य शाळा व उच्च माध्यमिक शाळेतील क्रीडा शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे पुरस्कार राज्य व जिल्हास्तरीय असून राज्यासाठी 50 हजार, तर जिल्ह्यासाठी 10 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. गौरवपत्र व सन्मानचिन्ह असेही या पुरस्काराचे स्वरूप असेल.
राज्यातील आठ विभागांतून एक पुरुष व महिला असे 16 पुरस्कार देण्यात येतील. जिल्हास्तरीय एक पुरुष व महिला असे 70 पुरस्कार देण्यात येतील. यासाठी एक जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीची गत तीन वर्षांची कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. या पुरस्कारासाठी किमान 70 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
संस्थांना क्रीडा मार्गदर्शक नियुक्तीचा अधिकार
शाळांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी मानधन तत्त्वावर क्रीडा मार्गदर्शकांचीही नियुक्ती करण्याचे शासनाने ठरवले आहे. नियमित काम करीत असलेल्या शाळेव्यतिरिक्त इतर शाळांमध्ये क्रीडा प्रशिक्षण देऊ शकतील अशा क्रीडा मार्गदर्शकांना दरमहा रुपये पाच हजार मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार आहे. चार क्रीडा प्रकारांचे नियमित शिक्षण देणार्‍या व सलग 4 ते 5 वर्षे राज्य स्पर्धेत सहभागी होत असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्था यासाठी पात्र आहेत.
प्रत्येक विभागातील 25 शाळांमध्ये असे मार्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. यासाठी सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकांचाही विचार करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शैक्षणिक संस्थांना प्रस्ताव पाठवता येतील.
प्रशिक्षण शिबिरांच्या आयोजनास मदत
खेळाडू घडवणे, त्यांच्या कामगिरीत प्रावीण्य निर्माण करण्याच्या दृष्टीने क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी प्रशिक्षण देण्याचेही शासनाने ठरवले आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा व राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी एक कोटी 79 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता दिली आहे.