आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोयंका म्‍हणतो, पोलिसांनी मारहाण करून नोंदवला कबुलीजबाब; श्रीसंतनेही ओढली री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- स्‍पॉट फिक्सिंगमध्‍ये फसलेला शिल्‍पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा मित्र उमेश गोयंकाने दिल्‍ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्‍ली पोलिसांच्‍या स्‍पेशल सेलमध्‍ये मला मारहाण करण्‍यात आली आणि सट्टेबाजी प्रकरणी बळजबरीने लिहून घेण्‍यात आल्‍याचे उमेशने म्‍हटले आहे. यापूर्वी जामिनावर सुटलेल्‍या श्रीसंतनेही स्‍पॉट‍ फिक्सिंगमध्‍ये सहभागी असल्‍यासंबंधी कबुलीजबाब दिल्‍याचा पोलिसांचा दावा खोटा असल्‍याचे सांगून आपण असे काहीही नसल्‍याचे म्‍हटले आहे.

पोलिसांच्‍या मते, गोयंकाने मॅजिस्‍ट्रेटसमोर दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले होते की, राज कुंद्रासाठी तो सट्टेबाजी करत होता. आणि शिल्‍पा शेट्टीनेही एका मॅचमध्‍ये पैसे लावले होते. मात्र, गोयंकाने आपण हे दबावात लिहून दिल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच दिल्‍ली पोलिसांविरोधात केसही दाखल केली आहे.

दरम्‍यान, बुधवारी आपल्‍या घरी पोहोचलेल्‍या श्रीसंतचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. 27 दिवस पोलिस कोठडीत राहिल्‍यानंतर श्रीसंतला मंगळवारी जामीन मिळाला होता. बुधवारी कोची विमानतळावर त्‍याचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. उल्‍लेखनीय म्‍हणजे त्‍याच्‍या अटकेनंतर या शहरातील लोकांनी त्‍याच्‍याविरोधात निदर्शनेही केली होती.

आपण निर्दोष असल्‍याचे श्रीसंतने विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्‍हटले. गेल्‍या 27 दिवसांत जे पाहिले आहे, ते विसरण्‍यासारखे नाही. माझ्या शत्रूंनाही हे दिवस पाहायला मिळू नये, असे म्‍हटले.

त्‍यानंतर श्रीसंत त्रिपूनितुरा येथील नातेवाईक आणि गायक मधू बाळकृष्‍णन यांच्‍या घराकडे रवाना झाला. श्रीसंतच्‍या अटकेनंतर त्‍याचे आईवडील बाळकृष्‍णन याच्‍याच घरी राहत आहेत. आई-वडीलांना भेटल्‍यानंतर श्रीसंत खूप भावूक झाला होता.