आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेचा वेस्‍ट इंडिजवर रोमांचक विजय, भारताला आज विजय आवश्‍यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्‍ट इंडिजमध्‍ये सुरु असलेल्‍या तिरंगी मालिकेत श्रीलंकेने वेस्‍ट इंडिजचा 39 धावांनी पराभव करुन आव्‍हान कायम ठेवले. त्‍यामुळे अंतिम फेरीत जाण्‍यासाठी आज भारताला श्रीलंकेविरुद्ध होणारा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्‍यामुळे पुन्‍हा करा वा मरा अशा स्थितीत भारताला सामना खेळावा लागणार आहे. दुसरी बाब म्‍हणजे, भारताने हा सामना जिंकल्‍यास वेस्‍ट इंडिजवर बाहेर पडण्‍याची नामुष्की येऊ शकते.

वेस्‍ट इंडिज आणि श्रीलंका यांच्‍यातील दुसरा सामना पावसामुळे काल पूर्ण करण्‍यात आला. दुस-याही दिवशी झालेल्‍या पावसामुळे हा सामना 41 षटकांचा करण्‍यात आला होता.श्रीलंकेने 3 बाद 60 अशा स्थितीवरुन खेळण्‍यास सुरुवात केली. कुमार संगकाराने झुंझार खेळी करत संघाला 219 धावांपर्यंत मजल मारुन दिली. डकवर्थ लुईस पद्धतीमुळे वेस्‍ट इंडिजला 230 धावांचे आव्‍हान मिळाले. संगकाराने 95 चेंडुंमध्‍ये 90 धावांची नाबाद खेळी केली.

प्रत्‍युत्तरात वेस्‍ट इंडिजला 9 बाद 190 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेच्‍या गोलंदाजांनी टीच्‍चून गोलंदाजी केली. कर्णधार एंजेला मॅथ्‍यूजने 4 तर शमिंडा इरांगा याने 3 मोहरे बाद करुन वेस्‍ट इंडिजच्‍या फलंदाजीला खिंडार पाडले. श्रीलंकेचा कर्णधार मॅथ्‍युजने धोकादायक ख्रिस गेलला 14 धावांवर तंबूत पा‍ठविले. त्‍यानंतर 3 फलंदाज लवकर बाद झाले. वेस्‍ट इंडिजची 4 बाद 31 अशी स्थिती झाली होती. त्‍यानंतर लेंडल सिमन्‍स आणि डॅरेन ब्राव्‍हो यांनी 123 धावांची भागीदारी केली. परंतु, दोघे बाद झाल्‍यानंतर वेस्‍ट इंडिजच्‍या आव्‍हानातील हवा निघून गेली होती. धोकादायक केरॉन पोलार्ड मलिंगाच्‍या गोलंदाजीवर शुन्‍यावर बाद झाला. डेव्‍हॉन स्मिथ आणि मार्लन सॅम्‍युअल्‍स यांनाही भोपळा फोडता आला नाही.