Home »Sports »From The Field» Sri Lanka Bowls Out Australia In Mere 74 Runs

ऑस्‍ट्रेलियाचा 74 धावांमध्‍ये खुर्दा करणा-या श्रीलंकेचा निसटता विजय

वृत्तसंस्‍था | Jan 18, 2013, 14:13 PM IST

ब्रिस्‍बेन- ब्रिस्‍बेन येथील गॅबा मैदानावर यजमान ऑस्‍ट्रेलियाची श्रीलंकेने दाणादाण उडविली. पहिल्‍या एन दिवसीय सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाचा 74 धावांमध्‍येच फाडशा पाडल्‍यानंतर श्रीलंकेने 4 विकेट्सने विजय मिळविला. अर्थात श्रीलंकेलाही सहज विजय मिळविता आला नाही. ऑस्‍ट्रेलियन गोलंदाजांनीही श्रीलंकेच्‍या फलंदाजांना चांगलेच सतावले. परंतु, ऑस्‍ट्रेलियासाठी हा पराभव मानहानीकारक ठरला. ऑस्‍ट्रेलियाने गेल्‍या 27 वर्षांमधील ही नीचांकी धावसंख्‍या नोंदविली. तर आतापर्यंतची 70 नीचांकी धावसंख्‍या ओलंडली, एवढेच काय ते समाधान.

श्रीलंकेच्‍या नुवान कुलसेकराने धडाकेबाज कामगिरी केली. त्‍याने 10 षटकांमध्‍ये अवघ्‍या 22 धावांच्‍या मोबदल्‍यात 5 फलंदाज बाद केले. तर लसिथ मलिंगाने 3 मोहरे टीपून त्‍याला चांगली साथ दिली. एका वळेस ऑस्‍ट्रेलियाची 9 बाद 40 अशी धावसंख्‍या होती. आतापर्यंतची नीचांकी धावसंख्‍या नोंदविण्‍याची नामुष्‍की ऑस्‍ट्रेलियावर ओढावण्‍याची शक्‍यता होती. परंतु, अखेरच्‍या जोडीने ही नामुष्‍की टाळली.

अवघ्‍या 75 धावांच्‍या आव्‍हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचीही त्रेधातिरपीट उडाली. मिशेल जॉन्‍सन आणि मिशेल स्‍टार्क यांनी अनुक्रम 3 आणि 2 बळी घेऊन श्रीलंकेचा डाव अडचणीत आणला होता. परंतु, कुशल परेराने कसाबसा संघाला विजय मिळवून दिला.

ऑस्‍ट्रेलियासाठी आजची कामगिरी म्‍हणजे मोठी नामुष्‍कीच आहे. प्रथम फलंदाजी करताना आज नीचांकी धावसंख्‍या नोंदविली. ऑस्‍ट्रेलियाचा संघ अवघ्‍या 100 धावांच्‍या आत 4 वेळा गारद झाला आहे. त्‍यात 70 ही आतपर्यंतची नीचांकी धावसंख्‍या आहे. परंतु, ही कामगिरी लक्ष्‍याचा पाठलाग करताना नोंदविण्‍यात आली होती. ऑस्‍ट्रेलियाने न्‍यूझीलंडविरुद्ध एडिलेड येथे 27 जानेवारी 1986 रोजी 70 ही नीचांकी धावसंख्‍या नोंदविली होती.

Next Article

Recommended