आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srikanth Stuns World No. 10 Tien Minh Nguyen In Singapore Open

सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतची आगेकूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेली पी. व्ही. सिंधू आणि थायलंड ओपन चॅम्पियन के. श्रीकांतने गुरुवारी सिंगापूर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. एच. एस. प्रणवला पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत जपानच्या सिझुका उचिंडाचा पराभव केला. तिने 21-17, 17-21, 21-16 अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी तिला तब्बल 63 मिनिटे झुंज द्यावी लागली. सिंधूने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये बाजी मारली. मात्र, तिला दुसर्‍या गेममध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. जपानच्या खेळाडूने दमदार पुनरागमन करताना दुसरा गेम आपल्या नावे केला. तिसर्‍या निर्णायक गेममध्ये आठव्या मानांकित सिंधूने जपानच्या खेळाडूला 21-16 ने पराभूत केले. यासह सिंधूने स्पर्धेतील विजयी मोहीम अबाधित ठेवली.

थायलंड ओपन चॅम्पियन के. श्रीकांतचा उपांत्यपूर्व सामना शुक्रवारी हॉँगकॉँगच्या यून हुशी होईल. भारताच्या युवा खेळाडूने यापूर्वी यूनविरुद्ध सामन्यात विजय मिळवला होता.

गुरुवारी श्रीकांतला पहिल्या गेममध्येच अपयशाला सामोरे जावे लागले. तिएनने दमदार सुरुवात करताना 14-6 अशी मोठी आघाडी मिळवली. मात्र, श्रीकांतने लढतीत 16-16 ने बरोबरी साधली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या दोघांनी दोन गुणांची आघाडी घेताना 18-18 ने बरोबरी साधली होती. मात्र, व्हिएतनामच्या खेळाडूने तीन गुणांच्या आघाडीने पहिल्या गेममध्ये बाजी मारली.

त्यानंतर श्रीकांतने दुसर्‍या गेममध्ये 11-3 ने सरळ आघाडी घेत आगेकूच केली. ही आघाडी कायम ठेवत श्रीकांतने दुसरा गेम जिंकून लढतीत बरोबरी मिळवली. त्यानंतर तिसर्‍या निर्णायक गेममध्ये श्रीकांतने 21-8 ने बाजी मारली. या विजयासह त्याने अंतिम चारमध्ये धडक मारली.

63 मिनिटांत प्रणवचा पराभव
पाचव्या मानांकित पेग्यू डूने भारताच्या युवा खेळाडू एच. एस. प्रणवला पराभूत केले. प्रणवचे अवघ्या 63 मिनिटांत आव्हान संपुष्टात आले. चीनच्या खेळाडूने 21-17, 18-21, 21-12 अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी पाचव्या मानांकित पेग्यूला भारताच्या खेळाडूने चांगलेच झुंजवले.

झुइरुईची आगेकूच
अव्वल मानांकित ली झुइरुईने महिला गटातील विजयी मोहीम कायम ठेवली. तिने दुसर्‍या फेरीत मिनात्सू मितानीचा पराभव केला. तिने 17-21, 21-19, 21-12 अशा फरकाने विजय मिळवला.

प्रणीतची वोंगवर मात
भारताच्या साई प्रणीतनेही अंतिम आठमधील प्रवेश निश्चित केला. त्याने पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत यजमान सिंगापूरच्या झि लियांग डरेक वोंगला 24-22, 21-19 ने पराभूत केले.

तिएन पराभूत
भारताचा युवा खेळाडू के. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या तिएन मिन्ह नुगयेनला पराभूत केले. भारताच्या खेळाडूने 18-21, 21-15, 21-8 अशा फरकाने सामना जिंकला. या विजयासह त्याने अवघ्या 58 मिनिटांत व्हिएतनामच्या खेळाडूला स्पर्धेबाहेर केले.

ली चोंग वेई विजयी
अव्वल मानांकित ली चोंग वेईने चीनच्या चेन येइकुनला पराभूत केले. मलेशियाच्या खेळाडूने 30 मिनिटांत 21-11, 21-6 अशा फरकाने विजय मिळवला.