आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकांतने जिंकली थायलंड ओपन बॅडमिंटन स्‍पर्धा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- भारताचा उदयोन्‍मुख बॅडमिंटनपटू के. श्रीकांत याने थायलंड ओपन ग्रां प्री बॅडमिंटन स्‍पर्धा जिंकून तमाम भारतीयांना भेट दिली आहे. श्रीकांतने अग्रमानांकीत आणि जागतिक क्रमवारीत आठव्‍या स्‍थानी असलेल्‍या बून्‍सॅक पोन्‍साना याचा सरळ सेटमध्‍ये पराभवाचा धक्‍का देत विजेतेपद पटकाविले. श्रीकांतने त्‍याचा केवळ 34 मिनिटांमध्‍येच 21-16, 21-12 असा फाडशा पाडला.

श्रीकांतला या स्‍पर्धेत 13 वे मानांकन देण्‍यात आले होते. पहिल्‍या गेममध्‍ये दोघांमध्‍ये चांगलीच चुरस दिसून आली. एका वेळी दोघेही 15-15 अशा बरोबरीच्‍या स्थितीत होते. परंतु, श्रीकांतने बरोबरी मोडून काढली. त्‍यानंतर दुसरा गेम त्‍याने सहज खिशात घालून सामना जिंकला.

भारतीय बॅडमिंटनमध्‍ये 20 वर्षीय श्रीकांतने नवी आशा निर्माण केली आहे. मुळचा गुंटूर येथील श्रीकांतने यापूर्वी एशियन ज्‍युनियर चॅम्पियनशिपच्‍या उपांत्‍यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.