मुंबई - एन.श्रीनिवासन यांची बीसीसीआय का चेन्नई सुपरकिंग्ज, यापैकी कुणाला प्राधान्य द्यायचे, याबाबतची नीती जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत बीसीसीआयच्या महत्त्वाच्या उपसमित्यांच्या बैठकांच्या निमित्तानेही कुणाही सदस्याला एकत्र येऊ द्यायचे नाही, ही रणनीती आखली जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवासन यांनी बीसीसीआयची यापुढेही सेवा करण्याचे मनोमनी ठरवले असून त्यांची चेन्नई सुपरकिंग्ज या इंडिया सिमेंटच्या मालकीच्या फ्रँचायझीवर पाणी सोडण्याची तयारी केल्याची चर्चा.
श्रीनिवासन यांच्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पूर्व विभागातील बहुतांश सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांप्रमाणे चेन्नई सुपरकिंग्ज किंवा लाभाच्या अन्य कोणत्याही गोष्टीची आस ठेवली नाही, तर त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविता येऊ शकेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपरकिंग्जच्या मालकी हक्कांना सोडचिठ्ठी देणे सहजसोपी गोष्ट नाही. त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ती एकच गोष्ट श्रीनिवासन यांच्या पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येऊ शकते. त्यामुळेच श्रीनिवासन अद्याप
आपली भूमिका स्पष्ट करू शकले नाहीत.
१२ फेब्रुवारीला कार्यकारिणीची बैठक
सर्वोच्चन्यायालयाने २२ जानेवारीला दिलेल्या निकालाच्या दिवसापासून सहा आठवड्यांच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा निवडणुका घेणे बंधनकारक आहे. म्हणजे मार्चला किंवा त्यापूर्वी वार्षिक सभा निवडणुका घ्याव्या लागतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची पूर्वसूचना २१ दिवस आधी देणे बीसीसीआयच्या घटनेनुसार बंधनकारक आहे. त्यामुळे १२ फेब्रुवारीपूर्वी कार्यकारिणीची बैठक घ्यावी लागेल.
आयपीएल प्रक्षेपण हक्कासाठी बैठक
आयपीएल२०१५ साठी इंटरनेट हक्कांचे वितरण करण्याकरिता फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. मार्केटिंग कमिटीची १० फेब्रुवारी रोजी होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा एप्रिलमध्ये होणार असल्यामुळे त्या स्पर्धेच्या वितरण हक्कांबाबत टेंडर काढण्याबाबत बीसीसीआयला त्वरित निर्णय घ्यावा लागणार आहे.