आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासन यांच्यावर शरद पवार सर्मथकांकडून टीकेची झोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआय अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे, असे स्पष्ट संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर चेन्नईच्या सिमेंट किंगचे कट्टर विरोधक मानले गेलेले अनेक जण सक्रिय झाले आहेत. शरद पवार राष्ट्रीय निवडणुकांमध्ये व्यग्र असल्यामुळे त्यांनी सध्याच्या घडामोडीत विशेष रस दाखवला नाही. मात्र, त्यांचे खंदे समर्थक मानण्यात येणार्‍या माजी अध्यक्ष, नागपूरच्या शशांक मनोहर यांनी टीकेची तोफच डागली आहे, तर याच मुद्द्यावर गतवर्षी कोशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार्‍या अजय शिर्के यांनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटची आणि बीसीसीआयची विश्वासार्हताच धोक्यात आल्याचे म्हटले आहे. पवारांचे आणखी एक समर्थक मानले गेलेले सौराष्ट्राचे निरंजन शहा म्हणाले की, जे काही आहे ते न्यायालयालाच ठरवू द्या. मला या क्षणी तरी संघटनेत येण्यात रस नाही.

शशांक मनोहर यांनी मात्र स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे. एका टेलिव्हिजन वाहिनीवर मुलाखत देताना, मनोहर यांनी म्हटले आहे, आयपीएल घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावरून स्वत:हून दूर व्हायला हवे. आयपीएलमधील घोटाळ्यावर तोंडसुख घेताना मनोहर यांनी यंदाची आयपीएल स्पर्धा तहकूब करून या स्पर्धेची विश्वासार्हता क्रिकेट रसिकांमध्ये सर्वप्रथम पुन्हा एकदा निर्माण करा, असे आवाहन केले आहे. मनोहर म्हणाले, ‘मी यापूर्वीच जेव्हा आयपीएल घोटाळा उघड झाला, तेव्हा सखोल चौकशीची मागणी केली होती. माझ्या मते, या भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआयमार्फतच व्हायला पाहिजे कारण त्याची पाळेमुळे देशात सर्वत्र पसरली आहेत. सर्वप्रथम बीसीसीआयने आयपीएलकडे आणि क्रिकेटकडे ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ या दृष्टिकोनातून पाहू नये. खेळाचे पावित्र्य आणि विश्वासार्हता प्रथम जपावी.’ मनोहर यांनी निवडणुकांमुळे आखाती देशांमध्ये स्पर्धा आयोजित करण्याच्या निर्णयावरही टीका केली. तेथे स्पर्धा आयोजित करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. ‘श्रीनिवासन यांना वर्षभरापूर्वीच पदावरून दूर करायला हवे होते. सुप्रीम कोर्टाच्या मताशी मी सहमत आहे. आयपीएलची प्रतिमा सुधारण्याची गरज आहे,’ असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आय.एस. बिंद्रा म्हणाले.

विश्वासार्हतेवर मोठा आघात...
सर्वोच्च् न्यायालयाने व्यक्त केलेले मत म्हणजे बीसीसीआयच्या विश्वासार्हतेवरील मोठाच आघात असल्याचे मत एमसीएचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षी आयपीएल घोटाळ्याची नैतिक जबाबदारी म्हणून शिर्के यांनी कोशाध्यक्षपद सोडले होते.

श्रीनिवासन यांनी पद सोडावे...
श्रीनिवासन यांच्याविरुद्ध विरोधकांकडून मतप्रदर्शन होत असतानाच एका वेबसाइटने केलेल्या जनमत चाचणीमध्ये 14 हजार 524 लोकांपैकी सुमारे 90 टक्के क्रिकेटप्रेमींनी श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सोडावे, असे मत व्यक्त केले आहे.