आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीम श्रीनिवासन’ बिनविरोध: अध्यक्षपदासाठी एकाचेही आव्हान नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय क्रिकेटमध्ये या घडीला सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणार्‍या चेन्नईच्या नारायणस्वामी (एन.) श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी आव्हान देण्यासाठी कुणी मैदानात उतरलेच नाही. त्यामुळे रविवारी होणार्‍या बीसीसीआयच्या वार्षिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एन. श्रीनिवासन यांचीच अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड निश्चित झाली.

श्रीनिवासन यांच्यावर शरसंधान करणार्‍या कुणीही निवडणुकीसाठी अन्य जागांसाठीही आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. वार्षिक सभा अनेक वादग्रस्त विषयांमुळे गाजण्याची शक्यता आहे. श्रीनिवासन यांनी आपली टीम निवडताना सचिवपदी संजय पटेल यांनाच कायम ठेवले. पश्चिम विभागात दोन महत्त्वाची पदे जाऊन समतोल जाऊ नये यासाठी श्रीनिवासन यांनी रवी सावंत यांना उपाध्यक्षपद सांभाळण्याची विनंती केली. सावंत यांनी अध्यक्षांच्या विनंतीचा मान राखला. त्यामुळे कोशाध्यक्षपदावर हरियाणाच्या अनिरुद्ध चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. संयुक्त सचिव म्हणून अनुराग ठाकूर यापुढेही काम पाहणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के गैरहजर
श्रीनिवासन यांना विरोध करणारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व बीसीसीआयच्या कोशाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अजय शिर्के यांची शनिवारी सायंकाळपर्यंतची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी आपटे यांचे नाव पाठवले होते. मात्र, ते नाव पाठवण्यास विलंब केल्यामुळे आपटे यांना वार्षिक सभेच्या कामकाजाला सहभागी होता येणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

बीसीसीआयची संभाव्य टीम अशी
अध्यक्ष : एन. श्रीनिवासन
उपाध्यक्ष : रवी सावंत (पश्चिम विभाग)
राजीव शुक्ला (मध्य विभाग)
एस. पी. बन्सल (उत्तर विभाग)
शिवलाल यादव (दक्षिण विभाग)
चित्रक मित्रा (पूर्व विभाग)
सचिव : संजय पटेल, संयुक्त सचिव : अनुराग ठाकूर, कोशाध्यक्ष : अनिरुद्ध चौधरी