आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीसंतची भोपाळमध्ये अकादमी; फिटनेस सेंटरही सुरू करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सहाव्या सत्राच्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आजीवन बंदीला सामोरे जात असलेला भारतीय वेगवान गोलंदाज श्रीसंतचा देवावर पूर्ण विश्वास आहे. ‘मी कोणतेही चुकीचे काम केले नाही. त्यामुळे लवकरच पुनरागमन करीन,’असेही त्याने सांगितले.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळसह इतर मोठ्या शहरांत अकादमी व फिटनेस सेंटर सुरू करणार आहे. यासाठी तो पुन्हा 7 फेब्रुवारीला भोपाळचा दौरा करणार आहे. सासरे आणि सासू यांच्या लग्नाच्या 25 व्या अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त श्रीसंत सोमवारी भोपाळमध्ये पत्नी भुवनेश्वरीसोबत आला होता. या वेळी त्याने दैनिक भास्करच्या प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा केली.
दैनिक भास्करच्या प्रतिनिधीने श्रीसंतसोबत केलेली खास बातचीत
प्रश्न : सध्या काय करत आहेस? भविष्यात काही नवीन योजना आहे का?
श्रीसंत : (स्मितहास्यासह) आताच विवाहबद्ध झालो. पूर्णवेळ कुटुंबीयांना देणार आहे. हेच पाहा, सासू-सास-यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि या ठिकाणी मी आलो. प्रथमच मी भोपाळमध्ये आलो. या वेळी माझे चांगले स्वागत झाले. या ठिकाणी लवकरच जिम आणि क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी माझी या संदर्भातील व्यक्तींशीदेखील चर्चा झाली आहे.
प्रश्न : पुनरागमनाचा काय विचार आहे?
श्रीसंत : (दोन्ही हात वर करून) त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी चुकीचे काहीही केलेले नाही. लवकरच हे वाईट दिवस निघून जातील.
प्रश्न : बीसीसीआय व केरळ क्रिकेट संघटनेची तुझ्याबद्दलची भूमिका काय?
श्रीसंत : मला केरळ क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सर्वांची सकारात्मक भूमिका आहे. दोघांकडून भरपूर सहकार्यही मिळत आहे. त्यामुळे मला मदत झाली आहे.
प्रश्न : भारतीय संघाचा कर्णधार धोनीशी काही चर्चा?
श्रीसंत : तो आमचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मी दोन वर्ल्डकप खेळलो आणि जिंकलोदेखील. त्याच्यासोबतच्या अनेक सुखद आठवणी आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून सध्या त्याच्यासोबत काहीही चर्चा नाही. अशातच वीरेंद्र सेहवागसोबत चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यादरम्यान त्याची भेट झाली. त्याने या वेळी मार्गदर्शन करून माझे मनोबल वाढवले.