आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Mini Olympic Competation News In Marathi, Divya Marathi

‘तारीख पे तारीख’ने मिनी ऑलिम्पिकला मुहूर्त लागेना !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासनाने चार कोटींच्या निधीला मंजुरी दिल्यानंतरही राज्य मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाला मुहूर्त लागेनासा झाला आहे. राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्याकडून ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने आयोजनासाठीची समितीची बैठक रखडली आहे. त्यामुळेच स्पर्धा आयोजनासंबंधीचे वेळापत्रकच निश्चित झाले नाही. यातूनच शासनाने जाहीर केलेली ही स्पर्धा यंदाही ‘वा-यावरची वरात’ ठरण्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच या स्पर्धा आयोजनाला चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून स्पर्धा आयोजनासाठीचा महत्त्वाचा मार्ग मोकळा झाला. याच निधीअभावी ही राज्य स्पर्धा वर्षभरापासून रखडली होती. त्यानंतर आता क्रीडामंत्र्यांना आयोजन समिती अध्यक्ष म्हणून बैठकी घेण्यास फुरसत मिळत नाही. दोन वेळा ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ‘पुढच्या आठवड्यात घेऊ’ असा सूर क्रीडामंत्री आळवत आहेत. या बैठकीत स्पर्धा आयोजनाचे वेळापत्रक जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, बैठकच होत नसल्याने स्पर्धा आयोजनासंबंधी अधिका-यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

स्पर्धेमागची साडेसाती कायम?
मागील 19 वर्षांपासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन बंद झाले आहे. यापूर्वी 1995 मध्ये ही स्पर्धा झाली होती. त्यानंतर या राज्य स्पर्धेला नवसंजीवनी देण्याचा महत्त्वाचा निर्णय क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी घेतला. मात्र, घोषणेनंतर वर्षभरापासून या स्पर्धा आयोजनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निधीअभावी ही स्पर्धा रखडली होती. मात्र, शासनाने नुकताच निधीही मंजूर केला आहे. आता केवळ आयोजनाच्या वेळापत्रकासाठीची बैठकच होत नाही. त्यामुळे स्पर्धा आयोजनाचा मार्गच मोकळा होईनासा झाला आहे.

राजकीय डावपेचात खेळाडूंचा गेम!
आगामी विधानसभेच्या हालचालींना जोरदार सुरुवात झाली आहे. याच सत्तेच्या सारीपाटात अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सध्या क्रीडामंत्रीही गुंतल्याची चर्चा आहे. स्पर्धा आयोजनाकडेच पाठ फिरवल्या गेल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे.