आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steve Smith And Mitchelle Starc Pair Starts Aggressively

तिसरी कसोटी : नाबाद शतकाने धवन ‘शिखरा’वर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - डावखुरा सलामीवीर शिखर धवन भारतीय क्रिकेटचा नवा नायक बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी त्याने नाबाद 185 धावा ठोकून अनेक विक्रम रचले. 85 चेंडूंत पदार्पणात सर्वाधिक वेगवान आणि मुरली विजय (नाबाद 83) सोबत सर्वात मोठी भागीदारी (नाबाद 283) धवनने केली. कसोटी क्रिकेटमध्ये वनडे शैलीत खेळताना त्याने शनिवारचा दिवस गाजवला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 408 धावांत आटोपला.

शिखर धवनने पीसीए मोहालीत मनमोहक शैलीत फलंदाजी करताना वेगवान आणि फिरकीपटूंना धडा शिकवला. धवनने आपल्या खेळीत 33 चौकार आणि 2 षटकार खेचले. क्रिकेटचे सर्व फटके त्याने ताकदीने मारले. वेगवान कव्हर ड्राइव्ह मारण्याखेरीज त्याने उसळत्या चेंडूंवर हुक आणि पुलचे फटकेसुद्धा मारले. ऑफ आणि ऑन साइडवर त्याने सर्व गोलंदाजांना धुतले.

दुसर्‍या सत्रातच शतक झळकवले - पदार्पणाच्या सामन्यात एखाद्या फलंदाजाने स्फोटक कामगिरी करण्याचा योग खूप दिवसांनी बघायला मिळाला. धवनने जेवण आणि चहापानादरम्यानच शतक पूर्ण केले. शिखरच्या वेगवान फलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क चांगलाच बिथरला. या फलंदाजाला कसे रोखावे..या एका प्रश्नाने तो संकटात सापडला होता.

असे ठोकले शतक - भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव जेवणाच्या वेळेपूर्वी गुंडाळला. जेवणाच्या आधीचे एकमेव षटक आणि जेवणानंतरचे षटक विजयने खेळून काढले. यानंतर दोन सत्रांत मोहालीत धवन नावाचे तुफानच अवतरले. धवनने 50 चेंडूंत 50 धावा 12 चौकारांच्या मदतीने तर 85 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने 100 धावा ठोकल्या. त्याने 150 धावांचा टप्पा अवघ्या 131 चेंडूंत 29 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने गाठला.

विक्रमासाठी पाच चौकार आणखी हवेत - धवनने पदार्पणात 33 चौकार मारले आहेत. पदार्पणात सर्वाधिक 37 चौकारांच्या विक्रमापासून तो थोडा दूर आहे. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला आणखी पाच चौकारांची गरज आहे. याच शैलीत त्याने रविवारी फलंदाजी केली तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगवान द्विशतक ठोकणार्‍यांच्या यादीत त्याचे नाव झळकेल.

27 व्या षटकात पूर्ण केले शतक - मोहालीत भारतीय डावाच्या 27 व्या षटकातच धवनने आपले शतक पूर्ण केले. यावरूनच त्याच्या आक्रमक खेळीचा अंदाज येऊ शकतो. त्या वेळी भारताचा स्कोअर 148 धावा असा होता. यात विजयचे योगदान फक्त 37 धावांचे होते. चहापानानंतर शतकवीर शिखर पॅव्हेलियनमध्ये परतला त्या वेळी सर्वात आधी ऑफस्पिनर हरभजनसिंगने त्याचे अभिनंदन केले.

मिशेच स्टार्कचा अडथळा - सकाळी ऑस्ट्रेलियाने 7 बाद 273 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कांगारूंचा डाव 408 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ (92) आणि मिशेच स्टार्क (99) यांनी चांगली कामगिरी केली. दोघांची शतके थोडक्याने हुकली. दोघांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत सर्वोत्तम कामगिरी करताना आठव्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली.

सलामीला शतक ठोकणारा पहिलाच - पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा शिखर धवन भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, सलामीला येऊन कोणालाही अशी कामगिरी करता आली नाही. के.सी. इब्राहिमने दिल्ली कसोटीत सलामीला येऊन 1948 मध्ये विंडीजविरुद्ध 85 धावा काढल्या होत्या.