आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण सोडून स्मिथ विश्वविख्यात क्रिकेटपटू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपला जहीर खान आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ यांच्यात एक साम्य आहे. दोघांनाही क्रिकेटसाठी आपल्या शिक्षणावर पाणी सोडावे लागले. जहीर खान श्रीरामपूरला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात होता. मुंबईच्या संघात त्याची निवड झाली आणि कॉलेजच्या दांड्या वाढल्या. मुख्याध्यापकांनी अनेक पत्रे घरी पाठवली. शेवटी त्याच्या वडिलांनाच खडसावले व मुलगा कॉलेजला का येत नाही, असे विचारले. जहीरच्या वडिलांनी जेव्हा त्यांना विनंती केली की, एक वर्ष क्रिकेट खेळून पाहतो, नाही तर पुढच्या वर्षी नियमित त्याला पाठवीन. त्यावर सर्व जण हसले होते. क्रिकेट खेळून काय पोट भरणार आहे का, असा सवाल त्यांनी जहीरच्या वडिलांना केला होता. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथच्या बाबतीतही तसेच घडले. सदरलँडच्या मेनाई हायस्कूलमध्ये त्याचे मन रमत नव्हते. त्याला क्रिकेटसाठी शाळा सोडायची होती. शाळेच्या वेल्फेअर ऑफिसला क्रिकेट या पोराचे किती भले करणार याची कल्पना नव्हती.

...शिक्षणाची गरज नाही!
‘मी स्मिथला घेऊन मुख्याध्यापकांकडे गेलो. त्याची व्यथा मांडली. त्यांना म्हटले, हा मुलगा केवळ क्रिकेट खेळून दरवर्षी १० लाख डॉलर्सची कमाई करू शकेल. तो क्रिकेटमध्ये एवढा उत्कृष्ट आहे की त्याला शालेय शिक्षणाची गरजच उरणार नाही,’असे स्टीव्हन स्मिथचे प्रशिक्षक वुडहिल म्हणाले. त्याच वेळी वुडहिल असेही म्हणत होते, ऑस्ट्रेलियन लोकांना सर्वांनी मार्क टेलर, स्टीव्ह वॉ यांच्यासारखेच खेळलेले हवे असते. स्मिथची शैली विचित्र होती.

भारतासाठी कर्दनकाळ
भारताच्या गत ऑस्ट्रेलिया दौ-यात हाच स्टीव्हन स्मिथ भारतीय संघाच्या मार्गातील मोठा अडसर ठरला होता. त्याची फलंदाजीची शैली वेगळी आहे. मात्र, यशस्वी होण्यासाठीची त्याची भूक मोठी आहे. तो आपली विकेट सहजासहजी देत नाही.

आता राष्ट्रीय संघाचे नेतृत्व
मुख्याध्यापकांना स्टीव्ह १० लाख डॉलर्स वर्षाला कमावेल असे म्हटले होते. आता स्मिथकडे संघाच्या नेतृत्वाचा मुकुट आहे.