आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपाकी ते भारत केसरी; गावच्या मल्लाने गाजवले हरियणात कुस्तीचे मैदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरची शेती बेतास बात.. त्यामुळे वडिलांनी जीप ड्रायव्हर बनून घराचा उदरनिर्वाह चालवलेला.. तरीदेखील खानदानी पहिलवानी म्हणून नाशिकच्या दांडेकर-दीक्षित तालमीत जायचो.. अशा परिस्थितीत घरच्यांवर तरी किती काळ अवलंबून राहायचं, असा िवचार करून कुस्ती शिकण्यासाठी बारावीनंतर कोल्हापूरला गेलो.. तिथे एका नामवंत मल्लाचा स्वयंपाकी बनून राहायचं, त्याला करून वाढायचं आणि आपण पण जेवायचं.. पण मग त्यात काही सराव नीट होईना.. मग कोल्हापूरला क्रीडा प्रबोधिनीत गेलो, तिथे मॅटवरची कुस्ती शिकलो, पुन्हा नाशिकला आलो.. आणि वर्षभरात महाराष्ट्र केसरी, कर्नाटक केसरी आणि आता भारत केसरीचा किताब पटकावला तेव्हा गावक-यांना पटलं की आपला राहुल मोठा पहिलवान झालाय...
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचा रहिवासी असलेला राहुल बोडके नुकताच हरियाणातील भिवानी येथे भारत केसरी किताब पटकावून नाशकात आला, त्यानंतर त्याने ‘दिव्य मराठी’शी मनमोकळा संवाद साधत त्याची संघर्षगाथाच विशद केली. थोडीशीच शेती असल्याने वडील जीप चालवून गुजराण करायचे. त्यांनी बालपणापासून आम्हाला व्यायामाची आवड लावली. घरापासून चार-पाच किलोमीटरवर असलेल्या रामशेजच्या किल्ल्यापर्यंत धावायचे. त्यानंतर दररोज तो किल्ला पळत चढायचा व उतरायचा, हा दिनक्रमच ठरून गेलेला होता. काही काळानंतर दंडबैठकांचा व्यायामदेखील सुरू केला. नाशिकला दांडेकर-दीक्षित तालमीतदेखील जायला लागला. तिथे प्रत्यक्ष हौद्यात उतरून कुस्ती खेळायला लागलो.
असा मिळाला प्रवेश
आर्टिलरी सेंटरला बाहेरच्या माणसाला प्रवेश मिळणे व मल्लांबरोबर सरावाची संधी मिळणेच शक्य नसते. मला संधी द्याच म्हणून ठाण मांडून बसू लागलो. अखेरीस तेथील वरिष्ठ साहेबांनी मला तुझी तयारी दाखव, असे सांगितले. त्यांच्या सर्वोत्कृष्ट मल्लाबरोबर कुस्ती खेळायला लावली. ती कुस्ती चांगलीच तुल्यबळ झाली. त्यांनी मला दररोज त्यांच्या मल्लांबरोबर सराव करण्याची संधी दिली.
मिशन ऑलिम्पिक
एम.कॉम. पूर्ण झाले असून मी एमपीएससीच्या परीक्षेचीही तयारी करत आहे. भविष्यात ९६ किंवा ८४ किलो वजन गटात खेळायचे हे मी सुशीलकुमार किंवा योगेश्वर दत्तशी चर्चा करूनच घेणार आहे. त्यानंतर थेट ऑलिम्पिक हेच लक्ष्य ठेवून तयारी करणार असल्याचे त्याने सांगितले.
...अन‌् स्वप्न साकार झाले
हरियाणातील भिवानीत भारत केसरीसाठी उतरताना प्रचंड दबाव होता. प्रतिस्पर्धी हरियाणाचाच असल्याने वेगवेगळ्या मार्गाने निरोप यायचे. हमारे बच्चे को जीतने दो, तुम जीत गये तो भी घर पहुंच नहीं पाओगे, असे सगळे प्रकार लढतीपूर्वी झाले. पण मैदानात उतरायचं, ते जिंकण्यासाठीच हे ठरवूनच मी मैदानात उतरतो. तसेच केले अन‌् मोळी डाव टाकून गुण वसूल केले. त्यात माझी उंची जास्त असल्याचाही मला फायदा झाला. अन‌् त्या लढतीनंतर भारत केसरी बनण्याचे माझे स्वप्न साकार झाले.