Home »Sports »Latest News» Story On Sachin Tendulkar

सचिनची अखंड क्रिकेट सेवा

विनायक दळवी | Jan 05, 2013, 00:39 AM IST

  • सचिनची अखंड क्रिकेट सेवा

मुंबई- ‘क्रिकेटशी प्रामाणिक राहा, तरच तुम्हाला क्रिकेट हा खेळ भरभरून देईल. मात्र, या खेळाशी अप्रामाणिक राहिलात तर हाच खेळ तुम्हाला दूर फेकून देईल,’ ही शिकवण आहे क्रिकेटमधील गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांची. ती शिकवण आजही त्यांचे शिष्य आचरणात आणताहेत. त्या शिष्यांमधला सर्वोत्तम शिष्य सचिन तेंडुलकर दोन तपांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीनंतरही या खेळाशी किती प्रामाणिक आहे, याचे उत्तम उदाहरण मुंबईत पाहायला मिळाले. मुंबईसाठी महत्त्वाच्या आणि बाद फेरीच्या बडोद्याविरुद्ध सामन्यात खेळण्याचे सचिनने मान्य केले आणि आचरेकरांच्या शिकवणुकीची चुणूक पाहावयास मिळाली.


मुंबई संघाचा सराव आज सकाळी 9.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर होता. सचिन मात्र सकाळी 7.30 वाजताच सरावासाठी हजर होता. वानखेडे स्टेडियमचे दरवाजेदेखील उघडले गेले नव्हते. कार्यालयातही कुणी उपस्थित नव्हते. सचिनने आपले सरावाचे रुटिन सुरू केले. सरावात तो स्वत:चा ट्रेनरही घेऊन आला होता. त्याने मैदानाला फेरी मारली. ठरावीक व्यायाम केला. मुंबई संघातील खेळाडू 9.30 वाजता आले. तोपर्यंत सरावाचा संपूर्ण कार्यक्रम आटोपून सचिन क्रिकेटच्या सरावासाठी सज्ज झाला होता.


दोनशे कसोटींच्या जवळ पोहोचलेल्या सचिनला खरं तर रणजी सरावासाठी 10 वाजता आल्यानंतरही कुणी विचारले नसते. परंतु आचरेकरसरांची शिकवण त्याच्या नसानसात एवढी भिनली आहे की, क्रिकेट खेळताना तो संपूर्ण वेळ क्रिकेटसाठी देतो. कारकिर्दीच्या निवृत्तीच्या टप्प्यात असतानाही नवोदित खेळाडूंच्या उत्साहाने तो सरावाला येतो.
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेटपटूंच्या गौरव सोहळ्याचे सचिनला विशेष निमंत्रण होते. जगमोहन दालमिया यांनी तर त्याला या समारंभासाठी येण्याची गळ घातली होती. परंतु सचिनने दालमिया यांनी विनम्रपणे सांगितले, मी मुंबईसाठी रणजी सामन्यात खेळणार आहे. त्याचा सराव मला करायचा आहे. सचिन एवढे बोलून थांबला नाही, त्याने दुपारी बी.के.सी. येथील क्रिकेट सेंटर गाठले. नेहमीचा सराव सुरू केला. आजही तो मुंबईसाठी क्रिकेट खेळणे हे प्रतिष्ठेचे, मानाचे मानतो. खेळण्याचे मान्य केल्यानंतर इतर खेळाडूंपेक्षा आधी सरावासाठी येतो. त्यासाठी पुरेसा वेळ देतो. सचिन इतरांपेक्षा मोठा क्रिकेटपटू का झाला, या प्रश्नाचे उत्तर यातच दडले आहे.

आयुधांची करत आहे पुजा
क्रिकेटमधील सर्वात व्यग्र असणा-या या क्रिकेटपटूने क्रिकेट या खेळासाठी किती पुरेसा आणि मनापासून वेळ दिला आहे हे पाहा. सचिन सरावासाठी नेहमीच पुरेसा वेळ देतो. या पुरेशा वेळेचे वाटेकरी त्याची क्रिकेटची आयुधेही असतात. सरावासाठी येताना त्याच्या क्रिकेट बॅगमध्ये त्याच्या बॅटचा संच असतो. 15 ते 20 पर्यंत बॅटी असतात. त्यात काही नव्या बॅटीही असतात. त्या नव्या आणि काही जुन्या बॅट्सवरही सचिनचा प्रेमळ हात फिरत असतो. त्याच्या किटमध्ये लाकूड तासण्याचा एक छोटा ‘रंधा’ असतो. ब्लेड असतात, सॅन्ड पेपर्स, पॉलिश पेपर्स असतात. सरावामध्ये ‘ब्रेक’ असताना तो यापैकी काही आयुधे घेऊन बॅट पॉलिश करत असतो. रंधा मारून बॅटींना आकार देतो, त्यांचे वजन कमी करतो. ग्रीप बसवतो. आजही हीच दिनचर्या, तोच सराव, क्रिकेटची तीच सेवा आणि क्रिकेट आयुधांची तीच पूजा सुरू आहे.

Next Article

Recommended