आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यातील खडतर प्रवासानंतर क्रिस फ्रुम ‘टूर द फ्रान्स’मध्ये चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- 3200 किलोमीटरचे एकूण अंतर असलेली टूर द फ्रान्स सायकलिंग चॅम्पियनशिप ही जगातील सर्वात कठीण स्पर्धा मानली जाते. मात्र, सध्याचा विजेता फ्रुमने आपल्या आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना केला की, त्याच्यासमोर टूर द फ्रान्सची वाट फारच छोटी आहे. इंग्लंडच्या माता-पित्याच्या पोटी जन्मलेल्या आणि केनियात वाढलेल्या फ्रुमचे आयुष्य फार खडतर आहे. त्याचे पाचसदस्यीय कुटुंब नैरोबीच्या एका कर्मचारी निवासामध्ये राहत होते. सायकल खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. शाळेतील एका शिक्षकाने त्यासाठी उधारीवर पैसे दिले. त्याच्याकडे बूटही नव्हते. प्रशिक्षकांकडून बूट घेऊन सराव केला. वर्षभर रस्त्यावर 70 ते 80 च्या गतीने धावणार्‍या ट्रॅकचा पाठलाग करून स्टॅमिना आणि गती अवगत केली. त्यामुळे त्याला हे यश गवसले. फ्रुम खेळातील सर्वात मोठा चॅम्पियन आहे. त्याने 100 वी टूर द फ्रान्स स्पर्धा जिंकली आहे.


आईच्या स्वप्नांनी दिले बळ

क्रिसची आई जेन फ्रुम नैरोबीमध्ये फिजिओथेरपीची नर्स होती. तिला खेळामध्ये कोणत्याही प्रकारची रुची नव्हती. मात्र, ती मुलांना प्रत्येक आनंद देऊ इच्छित होती. तिने क्रिसपेक्षा मोठ्या असलेल्या दोन मुलांना रग्बी स्कूलमध्ये टाकले. क्रिसला सायकलिंगची आवड होती. दरम्यान, त्याला आई जेन ही केनियाचा एकमेव स्टार सायकलिस्ट डेव्हिड किंजाहकडे घेऊन गेली. डेव्हिड हा सायकलिंगचा कोचही होता. त्याने क्रिसला मार्गदर्शन करण्यास होकार दिला. ‘डोळ्यांत नेहमी आनंदाश्रू पाहण्यासाठी उतावीळ असणारी आई आज हे जगातील सर्वात मोठे यश पाहण्यासाठी नाही,’ याची खंत क्रिसला आहे. 2008 मध्ये जेन फ्रुमचे निधन झाले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हॅक केला ई-मेल

2006 मध्ये क्रिसला सायकलिंगसाठी पहिली सर्वात मोठी संधी मिळाली होती. त्या वेळी त्याने ऑस्ट्रियात आयोजित 23 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पिनयशिपमध्ये केनियाकडून सहभाग घेतला होता. या वेळी त्याने सरळ मार्गाने स्पर्धेत सहभाग घेतला नाही. त्याने प्रवेशासाठी केनिया सायकलिंग असोसिएशनच्या ई-मेलला हॅक केले होते. पैसे नसल्याने त्याला कोचला स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जाता आले नाही. स्पर्धेत तो स्वत:च परफॉर्र्मर, कोच, असिस्टंट आणि ट्रेनर होता.

क्रिसच्या जीवनाचे वेळापत्रक


० 1985 मध्ये केनियात जन्म झाला. वडील क्लाइव्ह यांनी 19 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी पत्नी जेनला सोडचिठ्ठी देऊन दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य गेले. दरम्यान, जेन यांनीच क्रिसचे पालनपोषण केले.
०1996 मध्ये कोच डेव्हिड किंजाहची भेट घेतली. क्रिस सध्या या मोठ्या यशाचे श्रेय आईनंतर कोच किंजाह यांनाच देतो.
०1999 मध्ये वडील क्लाइव्ह यांनी क्रिसला आपल्याकडे दक्षिण आफ्रिकेत बोलावले. त्या ठिकाणी त्याने दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर तो केनियात परत आला.
०2006 मध्ये वर्ल्ड स्पर्धेत केनियाचे प्रतिनिधित्व केले. असोसिएशनचे ई-मेल हॅक करून प्रवेश निश्चित केला.
०2007ला इंग्लंडमध्ये तो व्यावसायिक खेळाडू बनला.
०2012 मध्ये टूर द फ्रान्समध्ये दुसरे स्थान गाठले. या वर्षी लंडन आॅलिम्पिक मध्ये कांस्यपदक पटकावले.
०2013 मध्ये 100 व्या टूर द फ्रान्सचा विजेता झाला.