आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा क्षेत्रातील ‘शुक्रतारा’ निवर्तला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘खेळ, खेळाडू आणि मैदान हेच माझे आयुष्य आहे. यासाठीच मी जगेन आणि मरेनही,’ असे म्हणत सुधीरदादा जोशी यांनी आयुष्यभर खेळाची सेवा केली. मराठवाड्यातील क्रीडामहर्षी ऊर्फ पितामह म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुधीरदादा यांच्यावर सोमवारी मध्यरात्री झोपेतच काळाने झडप घातली. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या क्रीडा क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

दादांनी केवळ क्रीडा क्षेत्रासाठीच आपले जीवन वेचले नाही तर शिक्षण क्षेत्राशी त्याची योग्य प्रकारे सांगड घालून अनेक नामवंत खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांची फौज निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादच्या 17 खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कारावर आपले नाव कोरले. क्रीडा क्षेत्रात त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील राजापिंप्री येथे सुधीर जोशी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1940 रोजी झाला. बी.एस्सी.चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करण्याचे ठरवले. औरंगाबादला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जिम्नॅस्टिकचा श्रीगणेशा केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या खेळाचा झपाट्याने विकास झाला. सुधीरदादांनी केवळ जिम्नॅस्टिकमध्येच नव्हे, तर बास्केटबॉल आणि कबड्डी खेळांमध्ये 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू घडवले. याशिवाय त्यांच्या तालमीत घडलेल्या 28 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. सुधीरदादांनी केलेल्या या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाने सन 1990-91 मध्ये त्यांना श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवले.

क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतानाच दादांनी महाराष्ट्राच्या क्रीडा समितीत सदस्य, औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे आजीव सदस्य, औरंगाबादच्या विभागीय क्रीडा समितीचे सदस्यपदही भूषवले. दादांनी 1996-2005 दरम्यान जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्षपदही भूषवले आहे. 1990 ते 2004 दरम्यान ते महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती आणि दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कारासाठीच्या निवड समितीवर सदस्य म्हणून कार्यरत होते. 1996-2005 मध्ये त्यांनी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव म्हणूनही काम केले आहे. 1974 ते 2004 दरम्यान ते महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे सदस्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अनेक खेळाडूंनी मोठे यश मिळवले.

उत्कृष्ट व्यक्तीमत्व हरपले
दादांनी जेवढे क्रीडा क्षेत्राताचा विकास केला, त्यांनी प्रत्येक सहकारी, विद्यार्थी इतर सर्वांना चांगल्या सवयीसाठी प्रयत्न केले. त्यांनी सहकार्‍यांना व्यसनापासून दुर ठेवले. त्यांचा सहवास मला 20 वर्षापेक्षा जास्त काळ लाभल्याने मी स्वत:ला धन्य समजतो. जे. यु. मिटकर, माजी सचिव एडीसीए

क्रीडा क्षेत्रातील झंझावात शमला
दादा हे क्रीडा क्षेत्रातील एक वादळ होते. स्पष्टवक्तेपणा, धाडसी निर्णय, कडक शिस्तीमुळे त्यांचा जिल्ह्यात नाही तर राज्यात दबदबा होता. त्यांच्या जाण्यामुळे क्रीडा क्षेत्राची हानी झाली आहे. त्याची पोकळी कधीही न भरून निघणारी नाही. क्रीडा क्षेत्रातील एक झंझावात शमला आहे. प्रा. ज्ञानोबा मुंढे, सहकारी

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यावर भर
दादांमुळे आम्हाला काम करण्यास ऊर्जा मिळत होती. ते नेहमी विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून काम करत असत. त्यांनी चुकीच्या कामांना कधीही प्रोत्साहन दिले नाही. डॉ. प्रदीप दुबे, प्राचार्य, एमएसएम

अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी
दादांनी आयुष्यभर क्रीडा क्षेत्रासाठी काम केले. आम्ही विविध खेळांचे कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवले होते. त्यावर काम सुरू केले असतानाच दादा गेले. आता त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य आम्हाला पूर्ण करायचे आहे. रामभाऊ पातूरकर, सचिव, एमएसएम