आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय क्रिकेट संघावर गावसकरांची कडाडून टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोठ्या विजयाच्या आनंदात मश्गूल होऊन सुस्त व्हायचे ही भारतीय क्रिकेट संघाची जुनीच सवय आहे, अशी खरमरीत टीका भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी साऊदम्पटन येथील कसोटीत दारुण पराभव स्वीकारणार्‍या भारतीय संघावर केली.
गत 1930 पासून भारतीय संघाबाबत असे घडत आहे. मात्र, सध्याचा संघ हा पूर्णपणे व्यावसायिक आहे. सुस्तीमुळे या संघाच्या कामगिरीवर परिणाम होणे अपेक्षित नाही. लवकरच त्यांनी ही कमतरता दूर करणे गरजेचे आहे. पाचव्या दिवसाची फलंदाजांची शरणागती पाहता गावसकरांनी ‘प्रतिकारशून्य’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. फलंदाजांनी अशा प्रकारचे गुडघे टेकणे म्हणजे प्रतिकारच न करण्यासारखे आहे. अजिंक्य राहणे वगळता कुणीही खेळपट्टीवर उभे राहण्याचाही प्रयत्न केला नाही.

अँडरसनची अप्रतिम गोलंदाजी!
अँडरसनने अप्रतिम गोलंदाजी केली, हे सत्य स्वीकारल्यानंतरही भारतीयांनी प्रतिकार केला नाही, याची खंत वाटते. आपल्या सहकार्‍यांपेक्षा अजिंक्य राहणे का उजवा फलंदाज वाटतो? कारण तो चेंडूपर्यंत पोहोचण्यापेक्षा चेंडू बॅटवर येण्याची वाट पाहतो. तो सरळ बॅटने खेळतो. त्याचबरोबर तो धावा काढण्याची एकही संधी सोडत नाही. काही फलंदाजांनी जड हाताने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दोन फलंदाज ही कसोटी वाचवू शकले असते. फलंदाजीच्या फॉर्ममध्ये असलेला मुरली विजय आणि मोठी खेळी खेळण्याची क्षमता असलेला चेतेश्वर पुजारा. दुसर्‍या डावात ज्या पद्धतीने मुरली विजय धावचीत झाला, ती गोष्ट म्हणजे विकेटचा अपव्यय होता, असेही ते म्हणाले.
पाच दिवसांत भारताचे खेळाडू सुस्त!
‘इंग्लिश संघाला लॉर्ड्सवर चारी मुंड्या चीत केल्यानंतर 5 दिवसांच्या अवधीत भारताचे खेळाडू एवढे कसे सुस्त झाले? त्यामुळे इंग्लंडला पुनरागमनाची संधी मिळाली. 5 दिवसांच्या अवधीत भारतीय संघाने नेमके काय केले, असा सवाल गावसकरांनी उपस्थित केला आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात आपण झेल सोडले, क्षेत्ररक्षणात चुका केल्या. आणखीही ढिसाळपणा दाखवला.