आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरचा मल्ल सुनील साळुंखे कर्नाटककडून हिंदकेसरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला - बामणीचा (ता. सांगोला) मल्ल सुनील सदाशिव साळुंखेने भीमपराक्रम केला. जमखंडीत (कर्नाटक) झालेली स्पर्धा जिंकून हिंदकेसरीचा किताब पटकावला. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या सुनीलने अंतिम सामन्यात हरियाणाच्या हितेशकुमारला ११-७ ने अस्मान दाखवले. खवासपूरच्या छत्रपती शिवाजीराजे तालमीतील वस्ताद भारत भोसले यांचा पठ्ठा असलेल्या उपमहाराष्ट्र केसरी सुनीलच्या यशाने सांगोला तालुक्यात आनंदाला उधाण आले आहे. मिरवणुकीनंतर अडीच किलोची चांदीची गदा आणि पाच लाख रुपये देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. सुनीलच्या रूपाने सांगोला तालुक्यास हिंदकेसरी होण्याचा पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे.

कर्नाटकातील जमखंडीत २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान रंगलेल्या स्पर्धेत देशातील नामवंत कुस्तीपटू सहभागी झाले होते. सुनीलने हरियाणाच्या रामपाल भोलू, महाराष्ट्राच्या विक्रम शिंदे, जम्मू-काश्मीरच्या सुरेंद्र सिंहला स्पर्धेत चीतपट केले. स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पदके पटकावली आहेत. यात ऋतुकेषला सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. ५५ किलो वजनी गटात प्रकाशला रौप्य, तर ६१ किलो गटात ज्योतिबा याने विभागून कांस्यपदक पटकावले आहे.

हितेशकुमारला चीतपट डावावर पाणी पाजले. मात्र सुरुवातीला हितेशकुमार ७ गुणांसह आघाडीवर होता. सुनीलने प्रतिआक्रमण करून ११ गुण मिळवले. विजयाची बातमी समजताच सांगोला तालुक्यात फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा झाला.

भावामुळेच ‘हिंमत’
सुनीलला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. त्याचा भाऊ हिंमत आधीच मैदान गाजवत होता. त्यामुळे सुनीलनेही कुस्ती क्षेत्र निवडले. हिंदकेसरी मारुती मानेंना तो आदर्श मानतो.

पहाटे ४ तास व्यायाम
पहाटे ४ ते ८ पर्यंत व्यायाम, ८ वाजता नाष्टा, सकाळी ११ वाजता जेवण, मग थोडी विश्रांती, दुपारी ३ ते ६ पुन्हा व्यायाम. त्यानंतर खुराक. रात्री ९ वाजता जेवण व विश्रांती असा दिनक्रम आहे.

मैदान गाजवले : २००८ मध्ये लिमगावला कोल्हापूरचा प्रसिद्ध मल्ल नंदू आबदारशी सुनीलने बरोबरी केली. २००९ मध्ये परभणीत झालेल्या स्पर्धेत रौप्य जिंकले. पुणे केसरीचा किताबही त्याच्या नावे आहे. गतवर्षी झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.