आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद - सुरेश रैना (नाबाद 99) आणि मायकेल हसी (67) यांच्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर 77 धावांनी पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 223 धावा काढल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 8 बाद 146 धावाच काढता आल्या.
धवन, संगकारा फ्लॉप
धावांचा पाठलाग करताना हैदराबादकडून पार्थिव पटेल (46), के. शर्मा (39) आणि टी. परेरा (23) यांनी झुंज दिली. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. धवन (3), संगकारा (3), विहारी (3), सॅमी (7) या फलंदाजांचे अपयश हैदराबादला भोवले. तत्पूर्वी, चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 223 धावा काढल्या. मुंबईविरुद्ध 79 धावांत धुव्वा उडाल्यानंतर चेन्नईने बदनामी टाळण्यासाठी शानदार फलंदाजी केली. डावखुरा सलामीवीर मायकेल हसी आणि सुरेश रैना यांनी तुफानी फलंदाजी करत दुसºया विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. या दोघांनी ईशांत शर्माला चांगलाच धडा शिकवला. ईशांतने 4 षटकांत तब्बल 66 धावा दिल्या.
चेन्नई दुस-यांदा दोनशेच्या पुढे
रैना आणि हसीच्या शानदार फलंदाजीच्या बळावर चेन्नईने या मैदानावर सर्वात मोठा स्कोअर उभा केला. हा या सत्रातील दुसरा सर्वात मोठा स्कोअर ठरला. चेन्नईने या सत्रात दुसºयांदा दोनशेचा टप्पा पार केला.
सुरेश रैनाचे दुसरे शतक एका धावेने हुकले
आयपीएलमध्ये आपले दुसरे शतक झळकावण्यापासून रैना अवघ्या एका पावलाने दूर राहिला. त्याने 20 व्या षटकाचा अखेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये मारला. मात्र, चेंडू चौकारासह सीमारेषेबाहेर गेला. या चौकारामुळे तो 95 वरून 99 वर पोहोचला. त्याने 52 चेंडूंत 11 चौकार आणि 3 षटकार मारून हैदराबादच्या गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. हसीने 42 चेंडूंचा सामना करताना 67 धावा काढल्या. यात 5 चौकार आणि 4 षटकार खेचले. मुरली विजयने 20 चेंडूंत 2 चौकार आणि तीन षटकारांसह 29 धावा काढल्या. कर्णधार धोनी 4 आणि रवींद्र जडेजाने तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 14 धावा काढल्या.
ईशांत सर्वाधिक महागडा
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध 4 षटकांत 66 धावा दिल्या. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी वरुण अॅरोनने 2012 मध्ये चेन्नईविरुद्ध 4 षटकांत 63 धावा दिल्या होत्या. पुणे वॉरियर्सच्या अशोक डिंडाने या सत्रात 13 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 षटकांत 63 धावा दिल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्ज : 3/223 (मायकेल हसी 67, सुरेश रैना 99*, मुरली विजय 29 रवींद्र जडेजा नाबाद 14, 3/45 परेरा), सनरायझर्स हैदराबाद : 8/146 (पार्थिव पटेल 44, के.शर्मा नाबाद 39, तिसारा परेरा 23, 2/28 मोहीत शर्मा, सुरेश रैना 1/4).
सामनावीर : सुरेश रैना.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.