आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunrisers To Bat First Against Mumbai Indians At Wankhede Stadium

IPL:पोलार्डमुळे मुंबई लॉर्ड !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वकाही अप्रतिम..अविश्वसनीय असेच घडले. मुंबईसाठी विजय अवघड वाटत असताना केरोन पोलार्ड (नाबाद 66, 27 चेंडू, 8 षटकार, 2 चौकार) नावाच्या तुफानाने इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादवर 7 विकेटने शानदार विजय मिळवून दिला. 13.2 षटकांत अंबाती रायडू 99 च्या स्कोअरवर बाद झाला. मुंबईला विजयासाठी 40 चेंडूंत 81 धावांची गरज होती. पोलार्डने दे दणादण चौकार, षटकारांचा पाऊस पाडून मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादने 3 बाद 178 धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 19.3 षटकांत 184 धावा काढून विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 20 गुणांसह अव्वलस्थान गाठले.

धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून डेवेन स्मिथने 21 तर सचिन तेंडुलकरने 31 चेंडूंत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38 धावा काढल्या. दिनेश कार्तिकने 30 आणि रोहित शर्माने नाबाद 20 धावा काढल्या.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या सनरायझर्सने मिशेल जॉन्सनच्या पहिल्याच षटकात 19 धावा फटकावून धडाकेबाज सुरुवात केली होती. 14 चेंडूंत 4 चौकारांसह 26 धावा फटकावणारा पार्थिव पटेल, 41 चेंडूंत 2 षटकार व 6 चौकारांसह 59 धावा फटकावणारा शिखर धवन यांनी हैदराबादचे शतक 12व्या षटकात धावफलकावर लावले. हनुमा विहारीने 37 चेंडूंत 41 धावा काढल्या. मात्र, सनरायझर्सच्या डावाला शेवटी वेग दिला 23 चेंडूंत नाबाद 43 धावा फटकावणार्‍या कॅमरून व्हाइटने. 3 चौकार व 3 षटकारांसह व्हाइटने सनरायझर्स, हैदराबादची धावसंख्या 20 षटकांत 178 पर्यंत नेली. मुंबईचे क्षेत्ररक्षण आज सुमार दर्जाचे झाले. धावा काढणार्‍या प्रत्येक फलंदाजाला मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षकांनी जीवदान दिले. धवल कुलकर्णी, मिशेल जॉन्सन, प्रग्यान ओझा या तिन्ही गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. जॉन्सनने 4 षटकांत 43, धवल कुलकर्णीने 42, तर ओझाने 37 धावा दिल्या.

पोलार्ड नावाचे तुफान
पोलार्डने अवघ्या 20 चेंडूंत 50 धावा ठोकल्या. त्याने 27 चेंडूंत 8 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 66 धावा काढून मुंबईचा विजय साजरा केला. पोलार्डने रोहितसोबत 37 चेंडूंत 85 धावांची भागीदारी केली.