आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surprise Pakage TO Cricket's God.. Amazing Travelling

‘सरप्राइज पॅकेज’ ते क्रिकेटचा देव...एक अद्भुत प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन माझा जवळच्या मित्रांपैकी एक आहे. 1989 मध्ये जेव्हा सचिनने भारतीय संघात प्रवेश केला तेव्हा मी संघातील जुन्या सदस्यांपैकी एक होतो. त्या वेळी सचिन अवघ्या सोळा वर्षांचा मुलगा होता. तो जेव्हा पहिल्यांदा आमच्या स्क्वॉडमध्ये भरती झाला तेव्हा इतक्या लहान मुलाला बघून आम्हाला खूप नवल वाटले होते. खरं तर त्या वेळी तो सर्व माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला होता आणि लोक त्याच्या खेळाची वाट बघत होते. आम्ही तेव्हा त्याला ‘सरप्राइज पॅकेज’ म्हणायचो. त्या सरप्राइज पॅकेजचा क्रिकेटचा देव बनण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
त्या वेळी सचिन वयाने लहान असला तरी क्रिकेटबद्दलची त्याची परिपक्वता खूप जास्त होती. त्यानंतर त्याचा आमच्यासोबतचा प्रवास सुरू झाला. ड्रेसिंगरूममध्ये इतक्या लहान वयाच्या खेळाडूला सोबत ठेवून वागणे आमच्यासाठी कठीण होते. कारण आम्ही सर्व वरिष्ठ खेळाडू. वयानेही आणि कारकीर्दीच्या बाबतीतही. त्याच्यासमोर काही अवांतर गप्पाही मारणे शक्य व्हायचे नाही. परंतु सचिन फारच वेगळा होता. आमच्या हाती कोल्ड्रिंक, खाण्यापिण्याच्या वस्तू असल्या तरी त्याच्या हाती नेहमी बॉल-बॅटच दिसायचे. खेळाच्या बाबतीत आम्ही सर्वच गंभीर असायचो, परंतु तो आम्हाला अधिक गंभीर वाटायचा. त्याला आमच्या गप्पाटप्पांपेक्षा खेळच अतिप्रिय होता. तो प्रत्येक वेळी कोणाला न कोणाला क्रिकेटविषयी माहिती विचारतच राहायचा. कधी गावसकर, कधी शास्त्री तर कधी अन्य कोणी. त्याला प्रत्येकजण नवनवीन मार्गदर्शन करत राहायचे. दरम्यान, ड्रेसिंगरूममधील प्रत्येकालाच सचिन नेमका काय आहे, हे कळून चुकले होते आणि त्यामधील गुणांचे दर्शनही होऊ लागले होते. अवघ्या काही दिवसांतच ड्रेसिंगरूमचा तो अविभाज्य घटक बनला.
सचिनची पहिली भेट : 1992-93 च्या दरम्यान सचिन बडोद्यात सामना खेळायला आला होता. त्या वेळी तो माझ्या घरी जेवायला आला. त्या वेळी खरं तर पहिल्यांदा आमचे जास्त ऋणानुबंध जुळले असे म्हणायला हरकत नाही. त्याला खाण्यापिण्याची पूर्वीपासूनच आवड आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याकडून त्याने अनेक पदार्थ हक्काने मागून खाल्ले होते. त्याने बडोद्यात शतक झळकावले होते. त्यानंतर आमच्या भेटीगाठी होतच राहिल्या. प्रत्येक वेळी सोबत जेवायला जाणे, शॉपिंगला जाणे होतच राहिले. मला शॉपिंगचा छंद आहे हे त्याला कळल्यानंतर त्याला खूप
आनंद झाला होता. कारण त्यालाही खरेदी करायला प्रचंड आवडते. मग विविध देशांच्या दौ-यांमध्ये आम्ही प्रत्येक वेळी सोबतच खरेदीला जायचो. आम्ही सोबत मिळून घेतलेल्या वस्तू आजही माझ्या संग्रहात आहेत. आता त्याच्या निवृत्तीनंतर मैदानावर सचिनची उणीव निश्चितच जाणवेल.
सचिन खूप रडला होता
सचिनच्या क्रिकेटप्रेमाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तो इतका पझेसिव्ह आहे की क्रिकेटमधल्या त्याच्या वैयक्तिक प्रदर्शनावर तो गंभीर चिंतन करत असतो. त्याने मला बरेचदा ही गोष्ट सांगितली की, मी शतकाजवळ जाऊन आऊट झालो तर मला जास्त दु:ख होत नाही. परंतु 30-40 धावा काढून आऊट झालो की मला जास्त राग येतो. कारण माझ्याकडून संघाला फक्त धावाच हव्या आहेत आणि त्या मी देऊ शकलो नाही तर मग फलंदाजीचा काय फायदा? सचिनविषयीच्या अशा ब-याच गोष्टी आहेत. एकदा मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात माझ्यात आणि सचिनमध्ये शतकी भागीदारी झाली होती. त्या वेळी सचिन 85 धावा काढून बाद झाला आणि ड्रेसिंग रूममध्ये येऊन रडायला लागला. संघातील प्रत्येक जण त्याला समजावत होता की, तू आज खूप चांगला खेळला आहेस, रडण्याचे काहीच कारण नाही. पण तो ऐकायला तयारच नव्हता.