आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swiss Gold Badminton Spardha News In Marathi, Sindhu, Kashyap,Saina

स्विस ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन: सिंधूची झुंज अपयशी; कश्यप, सायना पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बासेल- जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेली सिंधू आणि पी. कश्यपचे स्विस ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. या दोघांनाही उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत झाली. या तिघांच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या सिंधूला उपांत्य लढतीत चीनच्या सून यूने पराभूत केले. तिने भारताच्या 18 वर्षीय सिंधूवर 18-21, 21-12, 21-19 अशा फरकाने विजय मिळवला. यासाठी सूनला 79 मिनिटे झुंज द्यावी लागली. यासह सिंधूचे अंतिम फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले.

तत्पूर्वी, जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत दोन वेळची ऑल इंग्लंड चॅम्पियन शिजियान वांगला धूळ चारली. तिने सरळ दोन गेममध्ये 21-17, 21-15 अशा फरकाने सामना जिंकला. याशिवाय तिने अवघ्या 45 मिनिटांत महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली.

सातव्या मानांकित सिंधूने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये शिजियान वांगला चांगलेच झुंजवले. दरम्यान, वांगने लढतीत 12-12 ने बरोबरी साधली होती. त्यानंतर चार गुणांची कमाई करताना ऑल इंग्लंड चॅम्पियनने 16-15 ने आघाडी मिळवली.

कश्यपची निराशा
तिसर्‍या मानांकित कश्यपचीही उपांत्य लढतीत निराशा झाली. जागतिक क्रमवारीत 27 व्या स्थानी असलेल्या होऊवेईने लढतीत कश्यपवर 21-17, 21-11 ने मात केली. त्याने 42 मिनिटांत सामना जिंकला.

सायना 38 मिनिटांत बाहेर
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेली सायना नेहवाल 38 मिनिटांत पराभूत झाली. तिला जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या यिहान वांगने 21-17, 21-2 अशा फरकाने पराभूत केले.