आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 सामना : भारताची ऑस्ट्रेलियावर 6 गड्यांनी मात; युवीचे नाबाद अर्धशतक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - यजमान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहिमेला गुरुवारी धडाकेबाज विजयाने सुरुवात केली. भारताने टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया टीमचा 6 गड्यांनी पराभव केला. सामनावीर युवराज सिंग (नाबाद 77) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद 24) यांनी अभेद्य 102 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीमने 7 गड्यांच्या मोबदल्यात 201 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने चार गडी गमावून 19.4 षटकांत लक्ष्य गाठले. येत्या रविवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे.


धावांचा पाठलाग करणा-या भारताकडून शिखर धवन (32), सुरेश रैना (19), विराट कोहली (29) यांनीही संघाच्या विजयात योगदान दिले. रैना-धवनने दुस-या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली.


प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर अ‍ॅरोन फिंच आणि मॅडिसन यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, भुवनेश्वरकुमारने ही जोडी फोडली. त्याने मॅडिसनला त्रिफळाचीत केले. ऑस्ट्रेलियाच्या मॅडिसनने 16 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह 34 धावा काढल्या. त्यापाठोपाठ शेन वॉटसन (6) आणि कर्णधार जॉर्ज बेली भोपळा न फोडता तंबूत परतले.
दरम्यान, मॅक्सवेलने झंझावाती खेळी करताना 13 चेंडूंत 27 धावा काढल्या. त्याने चार षटकार ठोकत सलामीवीर फिंचसोबत चौथ्या गड्यासाठी 40 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हेन्रिक्स (12), नील (नाबाद 12), फ्युकनर (नाबाद 10) यांनी चांगली खेळी केली.


अ‍ॅरोन फिंचची अर्धशतकी खेळी व्यर्थ
अ‍ॅरोन फिंचने भारतविरुद्ध पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतका ठोकले. त्याने 52 चेंडूंत 14 चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने 89 धावा काढल्या. त्याला मॅडिसन, मॅक्सवेल यांनी चांगली साथ दिली. मात्र, फिंचने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.


भुवनेश्वर, विनयचे तीन बळी
भुवनेश्वर व विनयकुमारने सामन्यात प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. भुवनने 35 धावा देताना हे यश संपादन केले. विनयने 26 धावा देऊन मधल्या फळीतल्या जोडीला तंबूत पाठवले. यासह रवींद्र जडेजाने 23 धावा देऊन एक गडी बाद केला.


युवीचा झंझावात
युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झंझावाती खेळी केली. त्याने 35 चेंडूंचा सामना करताना आठ चौकार आणि पाच उत्तुंग षटकरांसह नाबाद 77 धावा काढल्या. त्याला धोनीची महत्त्वपूर्ण साथ मिळाली.


संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : 7 बाद 201 धावा (अ‍ॅरोन फिंच 89, मॅडिसन 34, मॅक्सवेल 27, 3/26 विनयकुमार, 3/35 भुवनेश्वरकुमार)
भारत : 4 बाद 202 धावा ( शिखर धवन 32, सुरेश रैना 19, विराट कोहली 29, युवराज सिंग नाबाद 77, महेंद्रसिंग धोनी नाबाद 24, 2/50 मॅकी, 1/24 डोहर्ती)