आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक टी-20 साठी ऑस्ट्रेलिया टीम सज्ज !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडने- पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणार्‍या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ निवड केली असून अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत कांगारूंनी संतुलित संघ निवडला आहे.
जॉर्ज बेअलीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. बेअलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला खेळाच्या या छोट्या स्वरूपात इंग्लंड आणि वेस्ट इंडीज येथे झालेल्या विश्वचषकापेक्षा अधिक चांगल्या कामगिरीची आशा आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले क्रिकेटपटू मायकेल हसी, डेव्हिड हसी, शेन वॉटसन, ब्रेड हॉज आणि क्लायंट मॅके यांना निवड समितीने टी-20 संघात निवडले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी फॉर्मात नसल्याने संघाबाहेर झालेल्या कॅमरून व्हाइटनेही पुनरागमन केले आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपच्या माध्यमातून व्हाइटला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सावरण्याची संधी देण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या पाचव्या सत्रातील चांगल्या कामगिरीचाही कॅमरून व्हाइटला फायदा झाला.
आगामी विश्वचषकात खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघच यूएई येथे पाकिस्तानविरुद्ध मालिकेत खेळेल, असे निवड समितीचे प्रमुख जॉन इनव्हर्ती यांनी नमूद केले. अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला आमचा संघ आहे. प्रत्येक खेळाडूचे खास वैशिष्ट्य हे आमच्या संघाचे शक्तिस्थान आहे. आमची टीम बॅलेंस आहे. जॉर्ज बेअलीच्या रूपाने आमच्याकडे अनुभवी कॅप्टन आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आम्ही तुल्यबळ आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
क्लायंट मॅके, पॅट कमिन्स, बेन हिल्फेनहॉस आणि मिशेल स्टार्क यांच्यावर कांगारूंच्या वेगवान गोलंदाजीची मदार असेल.
न्यूझीलंड संघात नवा चेहरा- टी-20 विश्वचषकसाठी न्यूझीलंड संघाचीही घोषणा करण्यात आली असून युवा वेगवान गोलंदाज अँडम्स मिल्ने हा संघात नवा चेहरा आहे. मिल्नेचा संघातील समावेश आश्चर्यकारक ठरला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 2010 मध्ये दोन टी-20 सामने खेळले होते. यानंतर त्याला न्यूझीलंडच्या कोणत्याही संघात स्थान मिळाले नाही. अनुभवी डावखुरा फिरकीपटू आणि माजी कर्णधार डॅनियल व्हिट्टोरीलासुद्धा 15 सदस्यीय टीममध्ये स्थान मिळाले आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा संघ 8 आणि 11 सप्टेंबर रोजी भारतात दोन टी-20 सामने खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ- जॉर्ज बेअली (कर्णधार), डॅनियल क्रिस्टियन, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्ती, बेन हिल्फेन हॉस, ब्रेड हॉज, डेव्हिड हसी, मायकेल हसी, ग्लेन मॅक्सवेल, क्लायंट मॅके, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, कॅमरून व्हाइट.