आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तिस-या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडला हरवले असते तर टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत दुस-या क्रमांकावर राहिली असती. एक एप्रिलच्या कट ऑफ डेटपर्यंत टीम इंडियाला तिस-या स्थानावरच समाधान मानावे लागले. टीम इंडियाने क्रमवारीत जी रिकव्हरी केली ती स्तुती करण्यायोग्य आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टॉप-4 च्या बाहेर राहिल्यानंतर भारताने झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवणा-या धोनी ब्रिगेडची स्तुती केलीच पाहिजे. कांगारूंच्या अशा पराभवाची कोणी कल्पनासुद्धा केली नसेल.
आता भारतीय संघ पुढचे 18 महिने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका खेळणार नाही. मात्र, विदेशी भूमीवर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंडविरुद्ध आपल्याला कसोटी खेळायची आहे. विदेशी भूमीवरच टीम इंडियाची खरी परीक्षा ठरेल. घरच्या मालिका विजयावरच खुश होणा-यांपैकी मी नाही. गेल्या पाच वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेला वगळता इतर बहुतेक संघ आपल्या घरच्या मैदानावरच दादागिरी केल्याचे चित्र आहे. द. आफ्रिका आपल्या घरात पराभूत झाली असली तरीही त्यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन हरवले. यामुळे आयसीसी क्रमवारीत दक्षिण आफ्रिका नंबर वन आहे.
आता मोठा प्रश्न हा आहे की, टीम इंडिया आगामी आपल्या विदेशी दौ-यावर यशस्वी होईल काय ? टीम इंडियाच्या मागच्या प्रदर्शनावरून मी मूल्यांकन करू इच्छितो. आजतरी धोनी ब्रिगेड उत्साहाने आगेकूच करीत आहे. संघात अनेक युवा, प्रतिभावान खेळाडूंनी स्थान पक्के केले आहे. अशा परिस्थितीत आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यात आपली कामगिरी वाईट होणार नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्येसुद्धा टीम इंडियाची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास आहे.
टीम इंडियात चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, विराट कोहली आणि शिखर धवन हे खेळाडू फलंदाजीत, तर आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार आणि रवींद्र जडेजा गोलंदाजीत चमकले आहेत. या तरुण तुर्कांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. पुजारा तर जगतल्या सर्वश्रेष्ठ युवा क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मात्र, विराट कोहलीसुद्धा त्यापेक्षा कमी नाही. या सर्व खेळाडूंना दबावात खेळ करण्याची कला आत्मसाथ केली आहे. भविष्यात गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग आणि जहीर खान यांना संघात स्थान मिळेल की नाही हे सांगता येणे कठीण आहे. मात्र, युवा खेळाडूंमुळे या खेळाडूंच्या अनुभवाला कमी लेखणे चुकीचे ठरेल. विदेशी दौ-यात अनुभवाची गरज असते. यामुळे संघात कोण असतील आणि कोण नाही हे सांगता येणार नाही. विदेशी दौ-यात योग्य वेगवान गोलंदाजांची नितांत गरज असते. उमेश यादव फिट झाला आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र, अजूनही संधी आहे. या दौ-यापूर्वी तीन ते चार वेगवान गोलंदाजांना शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची बीसीसीआयने व्यवस्था करायला हवी.
सचिन तेंडुलकरबाबत बीसीसीआयने त्याच्या निवृत्तीच्या योजनेवर चर्चा केली पाहिजे. संघात आता युवा खेळाडूंची उणीव नसल्याने त्याने निवृत्तीची योजना करावी, असे सचिनला स्पष्टपणे सांगायला हवे. सचिनप्रकरणी रहस्य ठेवू नये..पडदा उठला पाहिजे. अखेर किती दिवस तो अधिक योगदान न देता खेळत राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.