आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी-कोहली वादाच्या हवेतल्या चर्चा निराशाजनक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशने टीम इंडियाला वनडे मालिकेत २-१ ने हरवले. एक माजी खेळाडू मागच्या आठवड्यात मला भेटला तेव्हा त्याने विनोदाने म्हटले, फ्रान्सची टीम खेळली असती तर त्यांनीही टीम इंडियाला हरवले असते. आपले खेळाडू संपूर्ण दौर्‍यात रंगहीन दिसले. मागच्या एक वर्षात जबरदस्त प्रगती करणार्‍या बांगलादेशची स्तुती करावी लागेल. या विजयाचा बांगलादेश हक्कदार होता. टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंना बांगलादेशच्या दौर्‍यावर जायचे नव्हते, हे लपून राहिलेले नाही. गेले वर्षभर सतत क्रिकेट खेळल्यामुळे त्यांना विश्रांती हवी होती. बीसीसीआयने मात्र त्यांना विश्रांती दिली नाही. कारण, आयसीसीच्या राजकारणात बांगलादेश नेहमी बीसीसीआयचे समर्थन करत असताे. छोट्या राष्ट्रांशी बीसीसीआयचे चांगले संबंध आहेत. इंग्लंडने या छोट्या देशांना हीन दृष्टीने बघितल्याने आयसीसीमध्ये ते दुबळे होत गेले.

टीम इंडियाच्या व्यग्रतेचा तर्क दिला गेला, तर हे व्यावसायिक खेळाडू आहेत, त्यांना मोठी रक्कम मिळते, यामुळे त्यांनी खेळले पाहिजे. आपल्या खेळाडूंच्या व्यग्र कार्यक्रमाचा विचार केला, तर मागच्या वर्षी इंग्लंड दौर्‍यापासून ते आयपीएल-८ पर्यंत ते सलगपणे व्यग्र होते. टीम इंडियासारख्या खेळाडूंची व्यग्रता इतर देशांच्या खेळाडूंची नसते. आपल्या खेळाडूंची स्टार व्हॅल्यू अधिक आहे. मैदान आणि टीव्हीवर त्यांना पाहणे लोकांना आवडते. असे असले तरीही ते खेळले म्हणजे यशाची गॅरंटी नसते. माझ्या मते, इतर राष्ट्र करतात त्याप्रमाणे बीसीसीआयने खेळाडूंना रोटेट केले पाहिजे.

उदाहरण म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने काही दिवस विश्रांतीनंतर मंडळासोबत एक वर्षाचा करार केला आहे. तो टीम इंडियात असता आणि त्याने विश्रांतीची मागणी केली असती, तर त्याला राष्ट्रविरोधी म्हटले गेले असते. भारतीय खेळाडूंच्या सुमार कामगिरीचा बचाव करणे हा माझा हेतू नाही. मात्र, मी इतके निश्चित म्हणेन की टीम इंडिया ज्या वेळी खेळते, त्या वेळी कोणत्या ना कोणत्या वादाला तोंड फोडले जाते. सध्या कोहली-धोनी वादाला हवा दिली जात आहे. मी या दोन्ही खेळाडूंना जितका ओळखतो, त्यावरून म्हणेन की हे दोघेही टीम इंडियाला टॉपवर घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहेत. अवघ्या दोन पराभवांनंतर दोघांत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा करणे योग्य नाही. प्रत्येक वेळी, प्रत्येक सत्रात संघभावना कायम ठेवणे सोपे नाही. मात्र, याचा अर्थ ड्रेसिंग रूममध्ये गडबड आहे आणि प्रत्येक वेळी मतभेदाचे रूप दिले जावे, असा होत नाही. कोहली तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार बनण्यास आतुर असल्याची चर्चा आहे. मात्र, कसोटीत त्याच्या नेतृत्वाची स्किल आणि वनडेत सलग चांगले प्रदर्शन करण्याची समीक्षा, परीक्षा कुठे झाली आहे.

धोनीबाबत बोलायचे झाल्यास त्याला कसोटीचे नेतृत्व सोडण्यासाठी बीसीसीआयने म्हटले नव्हते. हा धोनीचा स्वत:चा निर्णय होता. नेतृत्व सोडून त्याने ड्रेसिंग रूममध्ये नव्या विचाराला संधी दिली, राजकारण केले नाही. कसोटी कर्णधाराला जो सन्मान मिळतो, वनडे कर्णधाराला मिळत नाही, हे त्याला चांगले ठाऊक असताना धोनीने नेतृत्व सोडले. कसोटी सोडले म्हणजे धोनीची उपयुक्तता कमी झाली आहे, असा अर्थ होत नाही. तो भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आणि यष्टिरक्षक आहे. तो आगामी वर्ल्डकपपर्यंत टीम इंडियाचा कर्णधार राहू शकतो. विराट कोहलीला हे कळत नसेल काय? माझ्या मते, धोनीने आता फ्रँट फूटवर येऊन ड्रेसिंग रूमचे वातावरण अधिक सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे केल्याने बिनबुडाच्या चर्चेला हवा मिळणार नाही.
बातम्या आणखी आहेत...